पुणे,{प्रभात वृत्तसेवा}- आजच्या परिस्थितीमध्ये कारागृह विभागात महिलांची परिषद होणे ही मोठी बाब आहे. आजच्या काळामध्ये स्त्रीला सन्मान व अधिकार मिळाला पाहिजे, असे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.
जागतिक महिला दिनाचे औचित्य दौलतराव जाधव तुरूंगाधिकारी प्रशिक्षण महाविद्यालयाच्या कारागृह कर्मचारी भवन येथे कारागृहांच्या लेकींचे राज्यस्तरीय कारागृह महिला अधिकारी, कर्मचारी परिषद उद्घाटन आणि महाराष्ट्र कारागृह सांख्यिकी २०२२ पुस्तीकेचे प्रकाशन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आले होते.
त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी कारागृह विभागाचे प्रमुख अतिरिक्त पोलीस महासंचालक, कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता, पश्चिम विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, सांख्यिकी अधिकारी श्रीकांत जावरकर आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते कारागृह विभागात सेवा करणाऱ्या महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यात आला. कारागृहाचे प्रमुख अमिताभ गुप्ता यांनीही कारागृहातील महिला कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
राज्यस्तरीय कारागृह महिला अधिकारी,कर्मचारी परिषदेत महिलांचे आरोग्य या विषयावर डॉ. शिल्पा थोरात आणि योगाचार्या रचना महाजन, महिलांच्या कायदेविषयक माहिती या विषयावर लॉ कॉलेजच्या प्राचार्य डॉ. दिपा पातुरकर, सी. ए. शलाका जोशी, आरती डीके, जुगनु गुप्ता यांचे व्याख्यान पार पडले.