पुणे- “करोनामुळे मानसिक ताण अनेकांवर आलेला आहे, परंतु राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जगताप यांच्यावर अधिकच आलेला दिसत आहे. यातूनच त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. राष्ट्रवादीने आधी आपल्या पक्षातील गुन्हेगार नगरसेवक आणि त्यांच्या नातेवाईकांची माहिती घ्यावी त्यानंतर आमच्यावर आरोप करावेत,’ अशा शब्दांत सभागृह नेते गणेश बिडकर यांनी जगताप यांच्यावर गुरुवारी पलटवार केला. भाजपचे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर यावेळी उपस्थित होते
बिडकर म्हणाले, “पुण्यात राष्ट्रवादीच्या अनेक विद्यमान पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप झालेले आहेत. त्यातील अनेकांसोबत जगताप यांची उठबस आहे. त्यांच्यासोबत फिरताना जगताप यांना कोणता संत्संग घडतो आहे? प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या आमदारकीच्या दोन वर्षेपूर्तीच्या कार्यक्रमात काही महिला त्यांचा सत्कार करण्यासाठी आल्या होत्या. मात्र, या महिलांचे भाऊ, पती काय करतात यावरून त्यांना जगताप बदनाम करत आहेत.’
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर खोटे आरोप करताना जगताप त्यांच्या पक्षाच्या इतिहासाचे, पक्षाच्या नेत्यांच्या भूतकाळाचेही विस्मरण झालेले दिसते.
– गणेश बिडकर,
सभागृह नेता, मनपा