पुणे– किरण गोसावी याने नोकरीच्या आमिषाने पुण्यातील काही तरुणांना आर्थिक गंडा घातला आहे. अशाच एका प्रकरणात फसवणूक झाल्याने चिन्मय देशमुख या तरुणाने गोसावीविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात 2018 मध्ये तक्रार दाखल केली होती. दरम्यान, हे पैसे परत मागितले असता गोसावी याने देशमुख याला धमकी दिल्याचे समोर आले असून, त्याचे रेकॉर्डिंगसुद्धा उपलब्ध असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
चिन्मय देशमुख याने किरण गोसावीकडे पैसे मागण्यासाठी फोन केल्यावर गोसावीने त्याला गलिच्छ भाषेत शिविगाळ केली होती. “सध्या एका कार्यक्रमाची तयारी सुरू असल्याने बिझी आहे. नाहीतर तुला बघून घेतले असते,’ अशी धमकीही दिली होती. इतकेच नव्हे, तर “तू पीएम किंवा सीएमला आण सगळ्यांना आत टाकेन. मला काय फरक पडत नाही,’ असेही गोसावी म्हणाल्याचे देशमुख यांनी पोलिसांना सांगितले आहे. या संपूर्ण वक्तव्यांचे रेकॉर्डिंग फिर्यादीकडे आहे. यामुळे गोसावीवर धमकी देण्याचा आणखी एक गुन्हा दाखल होऊ शकतो,’ असे पोलिसांनी सांगितले आहे.
ही कामगिरी खंडणी विरोधी पथक एकने केली आहे. यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक वेताळ, सहायक पोलीस निरीक्षक संदीप बुवा, पोलीस अंमलदार संजय भापकर आणि चव्हाण सहभागी झाले होते. गोसावी हा एका एनजीओचा मेंबर असल्याचे सांगतो. त्याची डिटेक्टिव्ह एजन्सी, स्टॉप क्राइम ऑर्गनायझेशन आणि एक जॉब कन्सल्टंसी एजन्सी असल्याचे सांगतो. त्याचा मेटलचा आयात-निर्यातीचा व्यवसायही असल्याची माहिती पोलिसांकडे आहे. पण, फिर्यादीने तत्कालिन पोलीस अधिकाऱ्यांना फसवणूक प्रकरणाची माहिती दिली होती. तेव्हा याची दखल का घेतली गेली नाही? हे मात्र अजूनही समोर आलेले नाही.
फिर्यादीला गोसावी याने धमकी दिली होती. फिर्यादीने तशी तक्रार केल्यावर नव्याने गुन्हा दाखल करू किंवा आहे त्या गुन्ह्यात कलम वाढवू. इतर शहरांत गोसावी याच्यावर गुन्हा दाखल असलेल्या पोलिसांना त्याचा रिमांड घेण्याचा अधिकार आहे.
– अमिताभ गुप्ता,
पोलीस आयुक्त, पुणे
… अशी आहे गोसावीची केस
सन 2018 मध्ये पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात गोसावी व त्याची व्यवस्थापक असलेली तरुणी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. तेव्हापासून ते दोघे फरार होते. दरम्यान, सिनेअभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याला पकडून “एनसीबी’ कार्यालयात नेताना गोसावी एका छायाचित्रात दिसून आला होता. दरम्यान, राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केलेल्या काही गंभीर आरोपांनंतर गोसावीचे नाव चर्चेत आले होते. मागील आठवड्यात किरण गोसावी याची व्यवस्थापक असलेल्या 27 वर्षीय तरुणीला पुणे पोलिसांनी अटक केली होती. गोसावी याने नोकरीच्या आमिषाने तरुणांना आर्थिक गंडा घातला आहे. त्याने तरुणांकडून घेतलेले पैसे या महिलेच्या बॅंक खात्यावर टाकल्याचे तपासात आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले होते.