Rajasthan Election : आज 25 नोव्हेंबर रोजी राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. राजस्थानमध्ये 200 विधानसभा जागांपैकी 199 जागांवर मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी अनेक राजकीय पक्षांनी कंबर कसली होती. अखेर आज राजस्थानमध्ये मतदान प्रक्रियेला सुरुवात झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आज सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या वेळेत मतदान होणार आहे. मतदान शांततापूर्ण पार पडण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सर्व तयारी पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे आजच्या या निवडणुकीसाठी दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत.
राजस्थानमध्ये 199 जागांवर 1,862 उमेदवार रिंगणात आहेत. आज 5 कोटी 25 लाख 38 हजार 105 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. राजस्थानच्या दिग्गजांसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. यामध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत, माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, दिया कुमारी, सचिन पायलट आणि राज्यवर्धन सिंह राठोड यांच्यासह अनेक बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपनेही सत्ता परिवर्तनासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत.
राजस्थान विधानसभा चुनाव के लिए आज वोट डाले जाएंगे। सभी मतदाताओं से मेरा निवेदन है कि वे अधिक से अधिक संख्या में अपने मताधिकार का प्रयोग कर वोटिंग का नया रिकॉर्ड बनाएं। इस अवसर पर पहली बार वोट देने जा रहे राज्य के सभी युवा साथियों को मेरी ढेरों शुभकामनाएं।
— Narendra Modi (@narendramodi) November 25, 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करत म्हटलं की, राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. माझी सर्व मतदारांना विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त मतदानाचा हक्क बजावून मतदानाचा नवा विक्रम निर्माण करावा. या निमित्ताने राज्यातील सर्व तरुण मित्र जे पहिल्यांदाच मतदान करणार आहेत त्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपनेही सत्ता परिवर्तनासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत.
दरम्यान, राजस्थानमध्ये 1993 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय झाल्यापासून दर 5 वर्षांनी सरकार बदलण्याची परंपरा आहे. कॉँग्रेस आणि भाजपमध्ये येथे लढत पाहायला मिळत आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत ही परंपरा कायम राहणार की बदलणार हे पाहावे लागणार आहे.