पुणे – महापालिकेच्या खर्चातून कचऱ्यासाठीच्या पिशव्या, बकेट, बाकडी, ढकलगाड्या खरेदी करण्याचा निर्णय झाला असून, हा निर्णय म्हणजे नगरसेवकांच्या निवडणूक प्रचारासाठी नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी असल्याने या वस्तूंची खरेदी आयुक्तांनी थांबवावी अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा शहर कॉंग्रेसच्या वतीने महापालिका प्रशासनास दिला आहे. याबाबतचे पत्र शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्यासह स्थायी समितीचे माजी अध्यक्ष वीरेंद्र किराड व संजय बालगुडे यांनी दिले आहे.
वस्तू खरेदी करून त्यावर नगरसेवक आपापली नावे लिहून त्या वस्तूंचे वाटप करतात, हा प्रचाराचाच एक भाग होईल. अवघ्या चार महिन्यांत निवडणुका होणार असल्याने नागरिकांकडून कररुपाने मिळालेल्या पैशांची उधळपट्टी होईल, हे गैर आहे. आर्थिक बेशिस्त आणि आर्थिक अनागोंदीला आळा घालावा. शिवाय, बदललेल्या प्रभाग रचना लक्षात घेऊन वस्तुंचे वाटप होण्याची शक्यता आहे. तसेच त्यातूनही गोंधळ उडेल, नगरसेवकांसाठी असलेल्या निधीतून ढकलगाडी खरेदी करण्यास सक्त विरोध राहील. ढकल गाड्यांवरही नगरसेवकांची नावे लिहून प्रचार साधला जाईल, असे या निवेदनात म्हटले आहे. तसेच हा उधळपट्टीचा प्रस्ताव तातडीने आयुक्त विक्रम कुमार यांनी आपल्या अधिकारात रद्द करावा अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही या पत्रात देण्यात आला आहे.