मेट्रोच्या भूमिकेने पुणे महापालिकेची अडचण

पालिकेच्या पत्रांना उत्तरही नाही

पुणे – मेट्रो प्रकल्पासाठी महापालिकेने जागा महामेट्रोकडे हस्तांतरित केल्यानंतर या जागांचे मूल्य महापालिकेच्या मेट्रोसाठीच्या हिश्‍श्‍यातून कमी करण्यात आलेली माहिती लेखी पत्र पुणे महापालिकेस देण्यास महामेट्रोकडून टाळाटाळ केली जात आहे. विशेष म्हणजे याबाबत महापालिकेने स्मृतिपत्र देऊनही त्याला मेट्रोकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. गेल्या तीन वर्षांत तब्बल 410 कोटी रुपये मूल्य असलेल्या जागा महामेट्रोला दिल्या आहेत. आतापर्यंत पालिकेने महामेट्रोला सुमारे 19 ठिकाणांवरील सुमारे 14 ते 15 हेक्‍टर जागा हस्तांतरित केल्या आहेत.

मेट्रो प्रकल्पात पुणे महापालिकेचा सुमारे 950 कोटी रुपयांचा हिस्सा असून या हिश्‍श्‍याच्या रकमेतून ही जागेची किंमत वजा केली जाणार आहे. दरम्यान, प्रकल्प सुरू झाल्यानंतर महापालिकेकडून देण्यात आलेली ही जागा असून त्या व्यतिरिक्‍त आणखी काही जागा महामेट्रोला लागणार आहेत. वजान ते रामवाडी हा संपूर्ण प्रकल्प पुणे महापालिकेच्या हद्दीतून जात असून स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या प्रकल्पाचा सुमारे साडेपाच किलोमीटरचा भाग पुणे हद्दीतून जात आहेत. या दोन्ही प्रकल्पासाठी पालिकेकडून कोथरूड डेपो येथील सुमारे 11 हेक्‍टर जागा तसेच स्वारगेट येथील मल्टिमॉडेल हबसाठी सुमारे अडीच हेक्‍टर जागा या दोन जागांसह इतर 17 ठिकाणांची लहान-मोठी अशी सुमारे साडेचौदा हेक्‍टर जागा महामेट्रोला हस्तांतरित करण्यात आली आहे. या जागा महापालिकेकडून महामेट्रोला हस्तांरित करण्यात आल्यानंतर महामेट्रोकडून महापालिकेने निश्‍चित केलेल्या शुल्काबाबत काहीच कळविण्यात आलेले नाही. त्यामुळे पालिकेकडून दोन ते तीनवेळा त्यांच्याकडे या जमिनींचे मूल्य पालिकेच्या हिश्‍श्‍यातून कमी करण्यात आल्याचे लेखी पत्र द्यावे अशी मागणी मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडून मेट्रोकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे. मात्र, त्यातील कोणत्याही पत्राला मेट्रोकडून उत्तर देण्यात आलेले नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.