दोघांच्या भांडणात एक ठार

पैशाच्या कारणावरून सुरू होता दिवसभर वाद

पुसेसावळी -पुसेसावळीहून औंधकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन युवकांमध्ये पैशाच्या कारणावरून झालेल्या मारामारीत एकजण जागीच ठार झाला आहे. दीपक शिवाजी मोरे (वय 35, रा. पुसेसावळी, मुळ खटाव) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या अमर अनिल चौगुले (वय 32, रा. पुसेसावळी, मुळ कोल्हापूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. नामदेव आनंदा चव्हाण यांनी पुसेसावळी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

अधिक माहिती अशी, दीपक व अमर या दोघांमध्ये रविवारी सकाळपासून बाचाबाची सुरू होती. पळशी येथून पैसे आणले का? याबाबत दोघांमध्ये संभाषण सुरू होते. अमर याने पैसे आणले नाहीत असे सांगितल्यावर दोघांत झटापट सुरू झाली. त्यात अमर याने दीपकच्या गुप्तांगावर लाथ मारल्याने तो जागीच कोसळला व मृत्यू पावला.

ही घटना रविवार, 23 रोजी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पोलिसांनी तातडीने संशयित अमर यास ताब्यात घेवून औंध पोलीस स्टेशनला हजर केले. उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल वडनेरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर यांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.