हेळगाव – हेळगाव, वाठार, किरोली परिसरात रविवारी दुपारी दोनच्या सुमारास ढगांच्या कडकडासह जोरदार पावसास सुरुवात झाली. चालू वर्षीचा हा परिसरात झालेला पहिलाच अवकाळी पाऊस होता. ढगाळ वातावरणामुळे कसल्याही परिस्थितीत आज पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. बऱ्याच प्रतिक्षेनंतर हेळगावला पावसाने अक्षरशः झोडपून काढले.
वीज, वारा आणि ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसास सुरूवात झाली. त्यामुळे शेतीच्या इतर कामांना वेग आलेला दिसेल. आले, हळद, तरकारी तसेच ऊस या पिकांना या पावसाचा फार मोठा उपयोग होणार असल्याने शेतकरी वर्ग समाधानी झाला आहे. दरम्यान, नडशी, उत्तर कोपर्डे, शिरवडे परिसरात दुपारी दोन नंतर जोरदार पावसाने हजेरी लावली.
सकाळपासून वातावरणात उकाडा जाणवत असताना जोरदार वारे व विजांच्या कडकडाटात आलेल्या पावसाने शेतकरी वर्ग चांगलाच सुखावला असून शेतकऱ्यांवर असलेले दुबार पेरणीचे संकट टळणार आहे.