कर्वे रस्ता, विधी महाविद्यालय रस्त्यांवरील कारवाईकडे दुर्लक्ष
अतिक्रमणांची संख्या वाढली, नागरिकांच्या तक्रारी मात्र बेदखल
पुणे – शहराचे विद्रूपीकरण रोखणे आणि रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी महापालिकेने जोरदार कारवाई सुरू केली आहे. मात्र, काही ठराविक भागांतच ही कारवाई होत असून डेक्कन परिसर, प्रभात रस्ता, भांडारकर रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता, कर्वे रस्ता या भागांत कारवाईचा बुलडोझर फिरवण्यास महापालिकेस वेळ नाही का? असा सवाल या भागातील नागरिक उपस्थित करत आहेत.
प्रशासक नेमताच पालिकेने शहरभर अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामे निर्मूलनाची मोहीम हाती घेतली आहे. मात्र, मध्यवर्ती भाग, डेक्कन परिसर, प्रभात रस्ता, भांडारकर रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता, कर्वे रस्त्यास जोडणाऱ्या मार्गांत इमारतींमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झालेली आहेत.
याशिवाय, अनेक इमारतींच्या फ्रंट मार्जिंनमध्ये हॉटेल अथवा दुकाने सुरू करण्यात आली आहेत. काही इमारतींच्या पार्किंगमध्येच खाद्यपदार्थांचे स्टॉल टाकण्यात आलेले आहेत. त्यामुळे अशा इमारतींच्या ठिकाणी येणारे नागरिक रस्त्यांवर वाहने पार्क करत आहेत. त्यामुळे स्थानिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
ही स्थिती कर्वे रस्ता, विधी महाविद्यालय रस्त्यावर सर्वाधिक आहे. या भागात मोठ्या प्रमाणात महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याने अनेकांनी इमारतींच्या फ्रंट मार्जिनमध्येच खाद्यपदार्थ, भाजी विक्री असे स्टॉल टाकत जागा अडवली आहे. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी ऐन वर्दळीच्या वेळेत जागा मिळेल तेथे वाहने उभी करतात.
त्यामुळे बऱ्याचदा पदपथ शिल्लक राहात नाहीत. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन रस्त्याने चालावे लागते. स्थानिकांनी अनेकदा तक्रार करूनही पालिका प्रशासन या भागातील कारवाईकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहे.