पुणे – हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गासाठी विद्यापीठ चौकातील पूल पाडण्यात आला. तेथे मेट्रोसह एकात्मिक दुमजली उड्डाणपूल उभारण्यासाठी 277 कोटी रुपयांच्या खर्चास पीएमआरडीए बैठकीत मान्यता देण्यात आली. यावेळी पूल उभारणीत महापालिकेने आर्थिक भार उचलावा, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
मेट्रो प्रकल्पासाठी शिवाजीनगर स्थानक व जिन्यासाठी जिल्हा व सत्र न्यायालय आवारातील आवश्यक 1 हजार 150 चौ. मीटर जागा हस्तांतर करण्यात येणार आहे. त्याबदल्यात न्यायालयास सर्व सोयीसुविधांसह तळमजल्यासह 5 मजल्यांची इमारत बांधणे आणि इमारत परिसराचे सुशोभिकरण करुन करारनामा करण्यासही या बैठकीत मान्यता देण्यात आली. या मेट्रो लाइनसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी थेट खरेदी प्रक्रियेने संपादित करण्यासाठी करण्यात आलेल्या खर्चासही मान्यता देण्यात आली. शिवाय, दोन सुविधा भूखंड ग्रामीण पोलीस विभागास हस्तांतरण केले जाणार आहेत.