“फॉरेस्ट ग्रीन’, पिवळा आणि लाल रंगाचे एलएचबी कोचेस
पुणे – पुणे-मुंबई मार्गावरील प्रवाशांसाठी जीवनवाहिनी असणारी डेक्कन क्वीन एक्स्प्रेस नव्या एलएचबी कोचेससह धावणार आहे. मात्र, यासाठी प्रवाशांना 22 जूनपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
पुणे-मुंबई-पुणेदरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन एक्स्प्रेसचे पारंपरिक कोचेस बदलण्यात येणार असून, त्याऐवजी डेक्कन क्वीन आता एलएचबी कोचेससह धावणार आहे. मागील काही दिवसांपूर्वी डेक्कन क्वीनच्या रंगसंगतीत बदल केला होता. निळ्या आणि पांढऱ्या रंगात धावणारी डेक्कन क्वीन आता नवीन लूक’मध्ये धावणार आहे.
अहमदाबाद येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन (एनआयडी) येथे डेक्कन क्वीनची रंगसंगती निश्चित केली आहे. फॉरेस्ट ग्रीन’, पिवळा आणि लाल हे रंग आता कोचेसवर दिसणार आहेत. मागील महिन्यात नवीन कोचेसदेखील मध्य रेल्वेत दाखल झाले आहेत. नियोजित रंगाला रेल्वे बोर्डाने दिल्यानंतर जानेवारी 2022 पासून कोचेस जोडण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, हा मुहूर्त लांबणीवरच पडला होता.
22 जूनपासून मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेस आणि 23 जूनपासून पुणे-मुंबई डेक्कन क्वीन एक्स्प्रेसला कोचेस जोडण्यात येणार आहेत. 4 वातानुकुलीत आसन, 8 द्वितीय श्रेणी आसन, एक व्हिस्टाडोम कोच, एक वातानुकुलीत डायनिंग कार, एक गार्ड कम ब्रेक व्हॅन आणि जनरेटर कार अशी एक्स्प्रेसची संरचना आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.