पुणे – महापालिकेचा कार्यकाल दि.14 मार्चला संपुष्टात येत आहे. त्यानंतर पालिकेवर प्रशासक नेमण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यातच ओबीस आरक्षणाच्या मुद्यावरून निवडणूक लांबलीच तर आपल्या प्रभागात केलेली विकासकामे तशीच पडतील, त्यानंतर पूर्ण झालेल्या या विकासकामांचे श्रेय इतर घेऊ शकतात, यामुळेच येत्या दहा दिवसात अशा कामांची उद्घाटने उरकण्यावर सत्ताधारी भाजप तसेच कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनाच्या नगरसेवकांची धांदल उडणार आहे.
महापालिकेचा कार्यकाल संपुष्टात येण्यास अवघे दहा दिवस उरले आहेत. भाजपची सत्ता असलेलीया पालिकेच्या कार्यकाळात 2019 आणि 2020 ही वर्षे करोना कालावधीत गेली. हा काळ सर्वच दृष्टीकोणातून अवघड ठरला. त्यामुळे भाजपला सत्तेची तशी तीनच वर्षे मिळाली. त्यातच या तीन वर्षांत शहर, उपनगरांतील विकासकामांचे श्रेय घेण्यावरून भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात सातत्याने वादविवाद सुरू राहिले. आम्ही सुरू केलेलीच कामे भाजपने नंतर पूर्ण केली, नव्याने त्यांनी काहीच केले नाही, जे काही केले ते आम्हीच करून ठेवले होते, असा दावा राष्ट्रवादीकडून सातत्याने केला गेला. तर, गेल्या पाच वर्षांत भाजपने शहराचा कायापालट केला असून त्याचे आयते श्रेय आता राष्ट्रवादी घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा भाजपकडून सातत्याने सांगितले गेले. याच आरोप-प्रत्यारोपात महापालिकेचा पाच वर्षांचा कार्यकाल आता दहा दिवसांनी संपुष्टात येत आहे.
आता, आगामी निवडणुकीचा बिगुलही प्रभाग रचनेतून वाजला आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा कायम असला तरी आपापल्या प्रभागातील विकासकामांची उद्घाटने करून घेण्यासाठी नगरसेवकांचे प्रयत्न असणार आहेत. दि. 6 मार्चला पंतप्रधान महापालिकेत येत असल्याने मोठे नेते शहरात असणार आहेत. पंतप्रधानांचा कार्यक्रम काही तसांचाच असल्याने त्यानंतर राज्यपातळीवरील अन्य नेत्यांना आपल्या प्रभागात घेऊन जाण्याचे प्रयत्न नगरसेवकांचे आहेत. यासाठी एक दिवस आगोदर दि. 5 किंवा दि.7 या दिवशीचा मुहूर्तही साधण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळेच या दिवशी राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनेच्या नगरसेवकांनीही अनेक कार्यक्रमांची उद्घाटने, शुभारंभाचे कार्यक्रम ठेवण्याचा किंवा मेळाव्यासाठी नेत्यांची वेळ मिळवण्याचा प्रयत्न आहे. यामुळेच शहर, उपनगरांत दि. 5 मार्चपासून कार्यक्रमांची धांदल असणार आहे.
शक्ती प्रदर्शनाचे प्रयत्न…
पुणे महापालिकेचा कार्यकाल 14 मार्चला संपुष्टात येत असताना आगामी निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तयारीत आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर उद्घाटने करण्याची घाईगडबड असतानाच आपल्या प्रभागात तसेच प्रभागाच्या नव्या भागात आपली ताकद, पक्षातील आपले वजन दिसावे, यासाठी विद्यमान नगरसेवकांप्रमाणेच माजी नगरसेवक, इच्छुक उमेदवार यांचे प्रयत्न असून पक्षाचा वरीष्ठ नेता आपल्या प्रभागात नेण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी आपापल्य पक्षाच्या नेत्यांचे “शेड्यूल’ तपासण्याचे त्यानुसार वेळ मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.