पुणे – लॉकडाउनमुळे उत्पन्नाचे स्रोत घटल्याने पालिकेसमोर आर्थिक अडचण निर्माण झाले आहेत. मिळकतकरातून पालिकेस तब्बल 1 हजार कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. या आर्थिक वर्षाचे पहिले आठ महिने लॉकडाउनमध्ये गेले असतानाही पालिकेने हा टप्प्पा गाठता आहे. मागील आर्थिक वर्षात (2019-20) मध्ये महापालिकेस पूर्ण वर्षभरात केवळ 949 कोटींचे उत्पन्न मिळाले होते. त्यामुळे लॉकडाउन असूनही महापालिकेसाठी यंदीची दिवाळी “गोड’ ठरली आहे.
करोनामुळे या आर्थिक वर्षाची सुरूवात लॉकडाउनमध्ये झाली. त्यामुळे महापालिकेस मोठ्या प्रमाणात उत्पन्नावर पाणी सोडावे लागले. पहिले लॉकडाऊन शिथिल होतानाच पालिकेने नागरिकांना मेच्या शेवटच्या आठवड्यापासून कर संकलन केंद्र सुरू केली. दुसऱ्या बाजूला ऑनलाइन संकलनासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले. त्यालाही पुणेकरांनी प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात कर जमा केला. कर भरल्यास दिली जाणारी सवलत लॉकडाउनमुळे 31 मेनंतर वाढवून जूनअखेरपर्यंत देण्यात आली. त्यामुळे पालिकेस उत्पन्न मिळाले.
त्यानंतर आता 50 लाखांच्या वर थकबाकी असलेल्या करदात्यांसाठी मिळकतकरात आकारण्यात आलेल्या दंडावर 80 टक्के सूट देत अभय योजना लागू केली असून, त्यातूनही यंदा पालिकेस तब्बल 151 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. त्यामुळे करसंकलन विभागाने यंदा नोव्हेंबरमध्येच हजार कोटींचा टप्पा गाठल्याची माहिती करसंकलन विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी दिली.