पुणे –सारसबागेनंतर महापालिकेने पथारी परवाना शुल्काचे तब्बल 3 कोटी रुपयांच्या थकबाकीप्रकरणी महापालिकेकडून गुरुवारी तुळशीबागेतील व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली. यावेळी सुमारे 221 व्यावसायिकांची दुकाने महापालिकेने बंद केली होती. त्यानंतर, सुमारे 90 व्यावसायिकांनी थकबाकी भरली असून त्यांना व्यवसाय करण्यास दुपारनंतर मुभा देण्यात आली आहे. मात्र, महापालिकेने अचानक केलेल्या कारवाईमुळे या भागात मोठा गोंधळ उडाला होता. मात्र, पालिकेने मोठा फौजफाटा नेत ही कारवाई केली.
तुळशीबागेत सुमारे अडीचशे अधिकृत परवानाधारक व्यावसायिक आहेत. त्यातील, सुमारे 225 व्यावसायिकांकडे 3 कोटींची परवाना शुल्काची थकबाकी आहे. महापालिकेने 2018 मध्ये परवाना शुल्काचे सुधारित दर लागू केल्यानंतर या व्यावसायिकांनी या दराला आक्षेप घेतला होता. तसेच राजकीय मध्यस्थी करत हे शुल्क कमी होईल या भरवशावर हे शुल्क भरले नव्हते. तर, नंतर सलग दोन वर्षे करोनाच्या साथीमुळे व्यवसाय बंद असल्यानेही व्यावसायिकांनी शुल्क भरलेले नाही यातील अनेक व्यावसायिकांचे शुल्क दोन लाखांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे पालिकेकडून वारंवार नोटीस देऊनही शुल्क भरले जात नसल्याने गुरुवारी अतिक्रमण विभागाने तुळशीबागच बंद केली. त्यामुळे अचानक कारवाई झाल्याने मोठा गोंधळ उडाला. त्यानंतर अनेक व्यावसायिकांनी ऑनलाइन तसेच जमेल तेवढ्या रकमेचे धनादेश अतिक्रमण विभागाकडे जमा केले. अशा व्यावसायिकांना लगेच दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली. तर ज्यांनी थकबाकी भरलेली नाही त्यांची दुकाने बंदच ठेवण्यात येणार असल्याचे अतिक्रमण विभागाकडून सांगण्यात आले. तसेच त्यासाठी या ठिकाणी अतिक्रमण विभागाने फिक्स पथकही तैनात करण्यात आले असून शुल्क न भरता दुकाने उघडल्यास साहित्य जप्त केले जाणार असल्याचे अतिक्रमण विभागाने स्पष्ट केले.
पैसे भरण्यासाठी हप्ते सुविधा द्या…
महापालिकेची कारवाई सुरू असताना एकाचवेळी एक ते दोन लाखांची रक्कम भरणे शक्य नसल्याचे अनेक व्यावसायिकांकडून सांगण्यात आले. गेल्या दोन वर्षांपासून व्यवसाय बंद असल्याने पैसे भरण्यास हप्ते सुविधा देण्याची विनंतीही व्यायवसायिकांनी केली. मात्र, शहरातील इतर व्यावसायिक वाढलेले शुल्क तसेच करोना काळातील शुल्क भरत असताना तुम्हीच का भरत नाही, असा सवाल करत महापालिकेकडून या व्यावसायिकांना पूर्ण शुल्क भरले तरच दुकाने सुरू करून दिली जातील, अशी भूमिका घेण्यात आली.