केसनंद, लोणीकाळभोर, लोणीकंद, पिरंगुटमधील जागांचा समावेश
11 कोटी रुपयांचा निधी मिळणार
पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) हस्तांतरीत करण्यात आलेल्या ऍमिनिटी स्पेसच्या जागांचा लिलाव करण्यात येणार आहे. केसनंद, लोणीकाळभोर, लोणीकंद, भुगाव, पिरंगुट, मारुंजी, कासारसाई, नांदे, सोमाटणे, मेदनकरवाडी आदी 14 ठिकाणंच्या भूखंडाचा लिलाव केला जाणार आहे. या जागांच्या लिलावातून सुमारे 11 कोटी रुपयांचा निधी मिळण्याची शक्यता आहे. या निधीतून विविध विकाम मार्गी लागणार आहेत.
पीएमआरडीए पायाभूत सुविधा निर्माण करण्याकरिता विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहे. या विविध प्रकल्पांच्या अंमलबजावणेकरिता निधी उभारणीचा स्रोत म्हणून ऍमिनिटी स्पेस च्या हस्तांतरित झालेल्या जागांचा लिलाव करण्याचा निर्णय पीएमआरडीएने घेतला आहे. त्यानुसार दिर्घ मुदतीच्या भाडेपट्टयाने हे भूखंड दिले जाणार आहे. हे लिलाव ऑनलाईन पध्दतीने होत असून त्यासाठी नागरिकांना ई बोली लावावी लागणार आहे. येत्या दि.23 मे पर्यंत नोंदणी करणाऱ्यांनाच ई बोलीमध्ये सहभागी होता
येणार आहे.
पायाभूत सोईसुविधा निर्माण होणार
ऍमिनिटी स्पेसमधील जागा ज्या हेतूसाठी वापरणे आवश्यक आहे. त्याच हेतूसाठी या जागांचा वापर करणे आवश्यक आहे. ई लिलाव पध्दतीने या जागा दीर्घ मुदतीच्या भाडेपट्याने दिले जाणार आहे. हा जागांच्या वापरामुळे संबधित गावांचा जलद विकास होण्याबरोबरच पायाभूत सोईसुविधा निर्माण होण्यास यामुळे मदत होणार असल्याचे उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी सांगितले.