पुणे –कमी वेळात जास्त येणारा पाऊस गेल्या तीन ते चार वर्षांत पुणेकरांनी अनुभवला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने यंदा पूरस्थितीचा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार संभाव्य पुरामुळे नागरिकांना स्थलांतरित करावी लागणारी शहरातील दहा ठिकाणे प्रशासनाकडून निश्चित करण्यात आली आहेत. तसेच पुराचा धोका असलेली तब्बल 23 ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. याशिवाय, जिल्हा प्रशासनाने शहरातील भूयारी मार्ग, पावसाळ्यात बाधित होणारे पूल यांची यादीही जाहीर केली आहे.
जिल्हा प्रशासनाकडून खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातून किती पाण्याचा विसर्ग केल्यावर शहरातील कोणता भाग बाधित होईल, अशी यादी तयार करण्यात आली आहे. त्यानुसार विसर्गाचे प्रमाण 40 हजार क्युसेक वेगाने असल्यास सावधानतेचा इशारा देण्यात येतो. विसर्गाचे प्रमाण 50 हजार क्युसेकपर्यंत गेल्यास संबंधित भागांतील नागरिकांचे स्थलांतर करणे आवश्यक आहे. त्यानुसार दिवाणी मेटल वर्कस एरंडवणा खिलारे वस्ती, पुलाची वाडी डेक्कम जिमखाना, पीएमपी आगार डेक्कम जिमखाना मागील बाजू, तोफखाना परिसर आणि कामगार पुतळा शिवाजीनगर, पुना रुग्णालय पिछाडी लगतचा भाग, सिताबाग कॉलनी व अष्टभुजा मंदिर नारायण पेठ, अमृतेश्वर मंदिराजवळील भाग शनिवार पेठ, ओटा घाट, नेने घाट, शेख सल्ला दर्गा, डेंगळे पूल कसबा पेठ, बारणे रस्ता मनपा वसाहत, गाडीतळ झोपडपट्टी, ताडीवाला रस्ता झोपडपट्टी परिसर आणि आंबिल ओढा लगतचा भाग यांना सावधानतेचा इशारा देण्यात येतो. तर कोंढवे-धावडे, समाज मंदिर ओढ्यालगतचा भाग, न्यू कोपरे हद्दीजवळ, उत्तमनगर इंदिरावसाहत, शिवणे नदीलगतचा भाग, वारजे तपोधाम, नांदेड नदीलगतचा भाग, वडगाव बु. व हिंगणे खुर्दचा काही परिसर, अलंकार पोलीस चौकीजवळील भाग कर्वेनगर रस्ता, दत्तवाडी व राजेंद्रनगर या भागांतील नागरिकांना कदाचित स्थलांतरित करावे लागणार असल्याचे अहवालात नमूद केले आहे.
पावसाळ्यात बाधित होणारे पूल
मुठा नदीवरील – खडकवासला धरण नदी पूल, शिवणे नांदेड पूल, बाबा भिडे पूल, नदी पात्रातील वाहतुकीस असणारा वर्तक उद्यानाकडील रस्ता, खिलारेवाडी गावठाणाकडील रस्ता, नाना-नानी उद्यानासमोरील रस्ता, रामनदीवरील महाबळेश्वर हॉटेल, रामवारा चौक येथील छोटा पूल, तर मुळा नदीवरील पुलांमध्ये औंध सीएक्युई यांना जोडणारा पूल, सुतारवाडी, पाषाण तलावालगतचा परिसर, बाणेर स्मशानभूमीजवळ, औंध घाट यांचा समावेश करण्यात आला आहे.