पुणे – दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने मुलाने आईचा खून केला. दसऱ्याच्या दिवशीच ही घटना घडली. सिंहगड रोड पोलिसांनी मुलाला अटक केली.
सचिन दत्तोपंत कुलथे (31, रा. नऱ्हे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर, विमल दत्तोपंत कुलथे (60) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी अनिता मोहन चिंतामणी (44, रा. नऱ्हे) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
सचिन आणि त्याची आई विमल कुलथे हे दोघेजण एकत्र राहात होते. सचिनला दारुचे व्यसन आहे. त्याच्या या व्यसनामुळे त्याची पत्नी त्याला एक वर्षापूर्वी सोडून माहेरी निघून गेली. चालक म्हणून काम करणारा सचिन मागील काही दिवसांपासून बेरोजगार होता.
मौजमजेसाठी तो आईकडे नेहमी पैशांची मागणी करत होता. दसऱ्याच्या दिवशी दारुसाठी पैसे न दिल्याने त्याने आईला सुरी आणि लाकडाने मारहाण केली. त्यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याने फिर्यादी बहिणीला याची माहिती दिली. घटनेनंतर तो फरार झाला होता. आईवर अंत्यसंस्कार केल्यानंतर अनिता चिंतामणी यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी त्याला स्वामी नारायण मंदिराजवळ असणाऱ्या टेकडी परिसरातील जंगलातून ताब्यात घेतले. सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कणसे तपास करीत आहेत.
आईच्या अंगावर वळ
वंशाला दिवा हवा म्हणून कुलथे कुटुंबीय आग्रही होते. सहा मुली झाल्यानंतर त्यांना मुलगा झाला. एकूलता एक मुलगा म्हणून त्याचे सर्वांनीच लाड केले. विमल कुलथे यांच्या पतीचे 2015 ला निधन झाले. दरम्यान, दसऱ्याच्या दिवशी फिर्यादी अनिता चिंतामणी या आपल्या आईला भेटायला माहेरी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना आपल्या आईच्या अंगावर वळ दिसले. तेव्हा त्यांनी चौकशी केल्यावर सचिनने मारहाण केल्याचे त्यांनी सांगितले. कोणालाही तो घरी येऊ देत नसे. फिर्यादी अनिता यांनी आपण पोलिसांकडे तक्रार करू, असे सांगितल्यावर मुलगा आणखी मारेन म्हणून आईने तिला तक्रार करायला नकार दिला होता.