पुणे – प्रत्येक वाचक हा आस्वादकच नाही तर समीक्षकही असतो. लेखक आणि वाचक यांची अदृश्य भेट वाचनालयात होते. यामुळे जीवनाचा आनंद मिळतो. वाचनालय म्हणजे शब्दांचे माहेर असते, असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर माऊली-आबा कटके यांनी केले.
वाघोली येथे विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर महिला बचतगट जनसंपर्क कार्यालयामध्ये वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, वाघोली गावाला धार्मिक तसेच सांस्कृतिक वारसाही लाभलेला आहे. आपल्या सुसंस्कृत गावात पुस्तकांचे दालन असावे, यातून सर्व घटकांना नव्या तसेच विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध व्हावीत, या उद्देशाने सदर वाचनालय सुरू करण्यात आले असल्याचे कटके यांनी सांगितले.
संत तुकारामनगर येथे महिला जनसंपर्क कार्यालयामध्ये महिलांसाठी वाचनालय चालू करण्यात आले आहे. या वाचनालयामध्ये महिलांना विविध कादंबरीत शैक्षणिक मनोरंजक तसेच माहिती विषयक सर्व प्रकारच्या पुस्तकांचे भांडार ज्ञानेश्व कटके यांनी उपलब्ध करून दिले आहे.
याबाबत महिला बचत गटाच्या अध्यक्षा प्रिया म्हणाल्या की, वाचनालय हे शारदेचे लावण्यरूप आहे. मुक्त सरस्वतीचे दर्शन पुस्तकांद्वारे होते. वाचनालयाच परंपरा खूप जुनी आहे, स्वातंत्रोत्तर काळापासून हे उपक्रम समाज ज्ञानोपासनेसाठी राबविला जातो. आपल्याला या माध्यमातून पुस्तकं उपलब्ध होत आहेत, याच लाभ घ्यावा. याद्वारे महिलांना पुस्तके वाचण्यासाठी दिली जातील, या वाचनालयाच्या माध्यमातून महिलांना विरंगुळा सोबत आवडता छंद वाचन जोपासनेमध्ये मदत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, या अनोख्या उपक्रमाबाबत महिलांनी ज्ञानेश्वर कटके यांचे आभार मानले आहेत. या वाचनालयाच्या माध्यमातून वैचारिक क्रांती, प्रगती व्हावी, अशा शुभेच्छा कटके यांनी दिल्या.