पुणे : शिवणे येथे पूर्ववैमनस्यातून गोळीबार केल्याप्रकरणात मोक्कानुसार दाखल असलेल्या गुन्ह्यात एकाला विशेष न्यायाधीश एस.आर.नावंदर यांनी जामीन मंजुर केला आहे.
ऋतिक कैलास एखंडे (वय 22) असे त्याचे नाव आहे. त्याने ऍड. अभिषेक हरगणे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला. आरोपीचे नाव एफआयआरमध्ये नाही.
घटनेचा कोणीही प्रत्यक्षदर्शी नाही. तो घटनेच्या ठिकाणी असल्याचा कोणताही पुरावा नाही. त्यामुळे त्याला मोक्का लागू होत नाही, असा युक्तीवाद ऍड. अभिषेक यांनी केला.
हा युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने जामीन मंजुर केला. ही गोळीबाराची घटना 8 ऑगस्ट 2021 रोजी नांदेड सिटी ते एनडीए रस्त्यावर घडली होती. यामध्ये एखंडेसह आणखी नऊ जणांवर खूनाचा प्रयत्न गुन्हा दाखल होता.