पुणे- पुणेकरांचा मेट्रोचा प्रवास आणखी सुखकर करण्यासाठी पुणे मेट्रोकडून “पुणे मेट्रो ऍप’ विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे मेट्रोची सेवा विस्तारताना पुणेकरांना तिकिटासाठी रांगेत न थांबता घरबसल्या तिकिट बुक करून प्रवास करता येणार आहे. याशिवाय, या ऍपच्या माध्यमातून मेट्रो स्थानकापासून प्रवाशांना फिडर सुविधेची माहितीसह मेट्रोचे वेळापत्रकही उपलब्ध होणार आहे.
अवघ्या तीन दिवसांपूर्वी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत सुरू झालेल्या मेट्रो सेवेला दोन्ही शहरांमध्ये भरघोस प्रतिसाद मिळत असून अवघ्या तीन दिवसांत एक लाखापेक्षा अधिक प्रवाशांनी मेट्रोचा प्रवास केला आहे. त्यामुळे मेट्रोकडून प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देण्याचे नियोजन महामेट्रोकडून करण्यात आले आहे. त्याअंतर्गत आता ऍपच्या माध्यमातूनही मेट्रोचा प्रवास करता येणार आहे. या ऍपअंतर्गत नागरिकांना तिकिट बुक करता येणार असून एकावेळी दहा तिकिटे बुक करता येणार आहेत. तर, हे तिकिट क्यू आर कोडच्या स्वरूपात असून त्यासाठी प्रवाशांना हे ऍप डाऊनलोड करावे लागणार असून त्यावर वैयक्तिक माहिती देऊन नोंदणी करणे बंधनकारक असणार आहे.