पुणे – महापालिकेतर्फे बांधण्यात येणारे भारतरत्न दिवंगत अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय “पीपीपी’ (पब्लिक प्रायव्हेट पार्टिसिपेट)ने बांधण्याच्या पर्याय निवडण्याला महाविद्यालय ट्रस्टने सोमवारी मंजुरी दिली.
वैद्यकीय महाविद्यालयाच्या केंद्रापासूनच्या परवानगी आणि सगळ्या प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम दोन वर्षांपासून सुरू होते. तात्पुरत्या स्वरूपात बाबुराव सणस शाळेमध्ये वर्गखोल्या, प्रयोगशाळा बांधण्यात आल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात महाविद्यालयाची इमारत बांधण्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. बऱ्याच जाचक अटी पूर्ण केल्यानंतर केंद्रानेही नुकतीच महाविद्यालयाला परवानगी दिली आहे. तीही 100 विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया करण्याला ही परवानगी दिली आहे.
यामुळे आता महापालिकेने इमारत बांधणी आणि हे महाविद्यालय सुरू करण्याच्यादृष्टीने पावले टाकायला सुरुवात केली आहे. त्यामध्ये हे महाविद्यालय चालवण्यासाठी ट्रस्टची स्थापना केली असली तरी ते सुरू करण्यासाठी ज्या काही पर्यायांचा विचार करण्यात येणार आहे, त्यात “पीपीपी’चाही विचार करण्याला हरकत नाही, असा निर्णय सोमवारच्या ट्रस्टच्या बैठकीत घेण्यात आला, तसेच त्याला तत्त्वत: मंजुरीही देण्यात आली.
हे महाविद्यालय बांधण्यासाठी अनेक पर्यायांचा विचार केला जाणार आहे. त्यातील एक पर्याय “पीपीपी’ आहे. या पद्धतीनेही ते कसे बांधता येईल, यासंदर्भात आपल्याला केंद्राकडून गाइडलाइन्स आल्या आहेत, त्यामुळे त्यानुसार या पर्यायाचाही विचार व्हावा हा यामागचा उद्देश्य आहे. – मुरलीधर मोहोळ, महापौर