सॉफ्टवेअर इंजिनिअर विवाहितेला तीन तलाक देणाऱ्या पतीवर गुन्हा

पिंपरी – सॉफ्टवेअर इंजिनिअर विवाहितेला पतीने तीन वेळा तोंडी तलाक दिला. विवाहितेने याप्रकरणी पोलिसांकडे धाव घेतली. मुस्लिम महिला (विवाहाच्या अधिकाराचे संरक्षण) कायदा, 2019च्या कलम 4 अन्वये याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत म्हाळुंगे येथे 17 जुलै 2021 ते 12 मार्च 2022 या कालावधीत हा प्रकार घडला.
एका 28 वर्षीय विवाहितेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फैजान जावेद जमादार (वय 30, रा. फुलेनगर, येरवडा, पुणे) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. फिर्यादी महिला आणि फैजान जमादार यांचे 24 डिसेंबर 2017 रोजी लग्न झाले. त्यानंतर विवाहितेचा पती फैजान जमादार, सासू, नणंद व काका हे मानसिक तसेच शारीरिक छळ करीत होते. याप्रकरणी विवाहितेने 13 जानेवारी 2022 रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. दरम्यान, 17 जुलै 2021 रोजी फिर्यादी विवाहिता मुलासह सासरी गेल्या होत्या.
त्यावेळी विवाहितेला घरात घेतले नाही. तसेच पती फैजान हा तीन वेळा तलाक म्हणाला. हा तलाक मान्य नाही, असे फिर्यादीने सांगितले. त्यानंतर फैजानने फिर्यादीला तीन वेळा नोटीस पाठविली. त्यात तलाक असा उल्लेख केला. तलाक मान्य नसून, नांदायचे आहे, असे फिर्यादीने नोटिसीला उत्तर दिले. दुसरे लग्न करणार आहे, असेही फैजानने नोटीसमधून सांगितले.





