पुणे – महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नसला तरी प्रारूप प्रभाग रचना पुढील महिन्याभरात अंतिम होणार असल्याने निवडणुका जाहीर झाल्यास गोंधळाची स्थिती टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांची जुळवाजुळव सुरू करण्यात आली आहे.
या सार्वत्रिक निवडणुकांसाठी तब्बल 25 हजार कर्मचाऱ्यांची आवश्यकता असणार असून आयोगाच्या आदेशाची वाट न पाहता पालिका प्रशासनाकडून ही माहिती संकलित करण्यास सुरुवात करण्यात आली असल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या निवडणुकीसाठी अत्यावश्यक सेवांचे कर्मचारी वगळता जवळपास 15 ते 16 हजार महापालिकेचे कर्मचारी असणार असून उर्वरित कर्मचारी शासनाच्या इतर विभागांकडून उपलब्ध करून घेण्यात येणार असल्याचे बिनवडे यांनी स्पष्ट केले.
विद्यमान महापालिकेची मुदत 14 मार्चला संपत असली तरी अद्याप महापालिकेची प्रभाग रचनाच अंतिम झालेली नाही. तसेच निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला नाही. त्यातच, राज्यशासनाकडून ओबीसी आरक्षणाबाबत न्यायालयात सुनावणी सुरू असल्याने निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे केलेली असल्याने आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत निवडणुका पुढे जातील अशी चर्चा आहे.
त्यासोबतच दुसऱ्या बाजूला दहावी-बारावीच्या परीक्षा झाल्यानंतर मे महिन्यात निवडणुका होतील असाही होरा बांधला जात आहे. त्यामुळे, दोन्ही स्थितीत निवडणुका जाहीर झाल्यास कामकाज गतीने करावे लागणार आहे. ही बाब लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाकडून मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्यासाठी हालचालींना वेग आला आहे.