करोनामुळे पालक-मुलांची भेट कठीण, पण “व्हीसी’चा पर्याय
विजयकुमार कुलकर्णी
पुणे – घटस्फोटाचा दावा सुरू आहे. मुलगा एका पालकाकडे आहे. दुसऱ्या पालकाला भेटण्यास न्यायालय परवानगी देत असते. मात्र, करोनामुळे न्यायालयीन कामकाजावर निर्बंध आहेत. या परिस्थितीत मुलांना बाहेर भेटणेही कठीण बनले आहे. अशा परिस्थितीत व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे पालकाला भेटण्यास परवानगी देण्याचे अर्ज येत आहेत. येथील कौटुंबिक न्यायालयाने 2020 पासून 778 पालकांना अशा प्रकारे ऑनलाइन भेटण्यास परवानगी दिली आहे.
अलीकडच्या काळात बदलत्या जीवनशैलीमुळे घटस्फोटासाठी दाखल होणाऱ्या अर्जांचे प्रमाण वाढले आहे. सरासरी वर्षाला 4 ते 5 हजार अर्ज येथील कौटुंबिक न्यायालयात दाखल होतात. मात्र, करोना परिस्थितीचा परिणाम न्यायालयीन कामकाजावर झाला आहे. कौटुंबिक न्यायालय ही त्याला अपवाद नाही. दावा निकाली निघण्यास वेळ लागत आहे.
घटस्फोटाचा दावा दाखल केल्यानंतर बहुतांश पती-पत्नी वेगळे राहत असतात. एका पालकाकडे मुलाचा ताबा असतो. दुसऱ्याला मुलाला भेटण्यास न्यायालय परवानगी देते. मात्र, करोनामुळे दुसऱ्या पालकाला मुलाला भेटणे अवघड जात आहे. अशा परिस्थितीत व्हिडिओ कॉल संजीवणी ठरत आहेत.
कौटुंबिक न्यायालयात चाईल्ड केअर सेंटर आहे. तेथे करोना परिस्थिती सुरू होण्यापूर्वी पालक आणि मुलांची भेट होत असत. मात्र, करोनाकाळात लागू केलेल्या निर्बंधाचा परिणाम न्यायालयीन कामकाजावर झाला आहे. चाईल्ड केअर सेंटर बंद असल्याने पालक आणि मुलगा यांना भेटणे अवघड बनले आहे. परिस्थिती पाहता बाहेर भेटणेही शक्य नाही. त्यामुळे पालक आणि मुलांच्या भेटीला आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा होत आहे. न्यायालयाने अशा पालकांना व्हिडीओ कॉलद्वारे मुलांना भेटण्याची परवानगी दिली आहे. त्याचा मुलाचा ताबा नसलेल्या पालकाला दिलासा मिळत आहे. प्रत्यक्ष नसले तरी ऑनलाइन मुलांना बघता आले. त्यांच्याबरोबर गप्पा मारता येत आहेत. ही समाधानकारक बाब आहे.
– ऍड. गणेश कवडे, माजी अध्यक्ष, दी फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन, पुणे