पुणे – आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज मुंबईत आंदोलन करणार आहे. त्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात हा समूह मुंबईकडे निघाला आहे. हा समाज मंगळवारी (दि. २३) शहरात दाखल होणार असून, रात्री वाघोलीत मुक्काम करणार आहेत. तर, बुधवारी (दि.२४ ) ते पिंपरीच्या दिशेने निघतील. या सर्व मार्गांसह मुक्कामाच्या ठिकाणी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त नेमला आहे.
यासाठी एक अपर आयुक्त, चार उपायुक्त, आठ सहायक आयुक्त, १६ पोलिस निरीक्षक, ५६ सहायक/उपनिरीक्षक आणि ५०० कर्मचारी नियुक्त केले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विजय मगर यांनी दिली. हा मोर्चा रांजणगांव येथून कोरेगांव भीमामार्गे चोखीदाणी, खराडी येथे मुक्कामी थांबणार असून दि. २४ जानेवारी रोजी चोखीदाणी, खराडी येथून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतून लोणावळा येथे मुक्कामी थांबणार आहे. मोर्चामुळे वाहतूक व्यवस्था प्रभावित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही मार्गांमध्ये तात्पुरत्या स्वरुपात बदल करण्यात आले आहेत.
नगरकडे जाण्यासाठी सोलापूर रस्त्याचा पर्याय
– मुंबई- पुणे द्रुतगती मार्ग तसेच कोल्हापूर, सातारा येथून नगरकडे जाणारी सर्व वाहने कात्रज खडी मशिन चौक -मंतरवाडी फाटा हडपसरमार्गे सोलापूर रस्ता केडगांव चौफुला, नाव्हरे-शिरुरमार्गे जातील.
– वाघोली, लोणीकंदमार्गे नगरकडे जाणारी सर्व वाहने थेऊर फाटा (सोलापूर रोड) येथून केडगांव चौफुला नाव्हरा मार्गे शिरुर ते नगर अशी वळविण्यात येईल.
– पुणे शहरातून नगरकडे जाणारी वाहने खराडी बायपास उजवीकडे वळण घेवून मगरपट्टा चौक – डावीकडे वळण घेवून सोलापूर रोडने यवत केडगांव चौफुला – नाव्हरे – शिरुर मार्गे जातील.
२३ जानेवारी रोजी नगर- पुणे मार्ग
१) सर्व वाहने थेऊर फाटा (लोणीकंद) येथून केसनंद – थेऊर मार्गे सोलापूर मार्गाने वळवण्यात येतील.
२) वाघोली परिसरामधील वाहने आव्हाळयाडी- मांजरी – केशवनगर- मुंढवा चौक अशी वळविण्यात येईल.