फुरसुंगी – मंतरवाडी चौक ते हांडेवाडी चौकादरम्यान बाह्यवळण मार्गावर लोखंडी साहित्याच्या गोडावुनसमोर भर रस्त्यातच दुतर्फा लोखंडी साहित्याने भरलेल्या अवजड वाहनांच्या रांगा लागत आहेत. हा मार्ग वाहतुकीसाठी अरुंद तसेच धोकादायक झाला आहे.
सध्या, मार्चएंडींग सुरू असल्याने वाहने अडवून वाहतूक पोलिसांकडून मोठी कारवाई करण्याची लगबग सुरू झाली आहे. हांडेवाडी वाहतूक पोलीस विभागाने रस्त्यात उभ्या राहणार्या अवजड वाहनांवर कारवाई करीत रस्ता मोकळा करावा, अशी मागणी वाहनचालक व नागरीकांकडून होत आहे.
सोलापूर महामार्गावरुन शहरात जाणारी सर्व अवजड वाहतूक हडपसर-गाडीतळमार्गे सासवड रस्ता मार्गे वळवून मंतरवाडी चौकातून कात्रज बाह्यवळण मार्गावरुन वळविण्यात आली आहे. या मार्गावर क्षमतेपेक्षा अधिक वर्दळ आहे. हा मार्ग हांडेवाडी, उंड्री, पिसोळी या दाट लोकवस्ती असलेल्या भागातून जातो, यामुळे इतर वाहनांची सुद्धा मोठी वर्दळ असते, त्यात हा मार्ग धोकादायक ठरत आहे.
जीवघेणे अपघात…
हांडेवाडी परीसरात रस्त्याच्या दुतर्फा लोखंडी बार, अँगल, पाइप व बांधकाम साहित्य विक्रेत्यांची दुकाने आहेत. या दुकांनात दररोज अवजड वाहनेभरून माल येतो आणि जातो. मात्र, येथील दुकानांना कोठेही पार्किंग तसेच वाहने उभी करण्यासाठी जागा नसल्याने ही वाहने रस्त्यालगतच उभी राहतात.
अशा उभ्या अवजड वाहनांतील लोखंडी सळ्यांमुळे अनेकदा जीवघेणे अपघात घडले आहेत. त्यामुळे अवजड वाहन चालकांबरोबरच अशा व्यावसायिकांवरही कडक कारवाई करुन गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी स्थानिक नागरीकांकडून होत आहे.
वजनकाट्यावरील रांगा रस्त्यावर…
या रस्त्यालगत अनेक ठिक़ाणी वजनकाटे आहेत. वजन करण्यासाठी येणार्या अवजड वाहनांच्या रांगाही रस्त्यावरच लागत असल्याने वाहतूक कोंडी होते. रस्ता व दुभाजकाला अशी वाहने धडकतात, तरीही संबधित खाते व हांडेवाडी वाहतूक विभागाचे पोलीस कुठलीही कारवाई करीत नाहीत. पोलिसांनी अवजड वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.