मनपा हद्दीत समाविष्ट होणाऱ्या 23 गावांतील लोकप्रतिनिधींचे मत
पुणे- मनपा हद्दीत 23 गावे समाविष्ट करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. जिल्हा परिषद गट अथवा पंचायत समिती गणाचे पूर्णत: महापालिकेमध्ये समाविष्ट होत आहे. अशा चार जिल्हा परिषदेचे सदस्य व सहा पंचायत समितीचे सदस्य यांचे गावे समाविष्ट करण्याबाबतचे मत जिल्हाधिकारी यांच्याकडे नोंदवले. यामध्ये सदस्यांनी गाव पालिकेमध्ये समाविष्ट होऊ द्या, मात्र आमचे सदस्यत्व कायम राहु द्या, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
आता जिल्हा प्रशासनाकडून याबाबतचा अहवाल राज्य शासनाला सादर करण्यात येणार आहे.
गावे समाविष्ट करण्याच्या प्रक्रियेमध्ये स्थानिक जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य यांचे म्हणणे विचारात घेणे आवश्यक असते.
जो गट अथवा गण पूर्णत: पालिकेमध्ये समाविष्ट होत आहे, अशाच सदस्यांची सुनावणी सोमवारी घेण्यात आली. या सदस्यांची नावे राज्य शासनाकडून निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार सोमवारी जिल्हाधिकारी यांच्याकडे याबाबतची सुनावणी झाली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समितीचे सदस्य यांनी आपापले म्हणणे जिल्हा प्रशासनाकडे सादर केले आहे.
दरम्यान, 23 गावे समाविष्ट करण्यासंदर्भात यापूर्वीच विभागीय आयुक्तांकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. याबाबतचा सकारात्मक अहवाल विभागीय आयुक्तांकडून नुकताच सादर करण्यात आला केला आहे.
दरम्यान, पुणे महापालिकेकडून देखील या गावांच्या समाविष्ट करण्यासंदर्भात ना हरकत असल्याचे पत्र राज्य सरकारला नुकतेच पाठवण्यात आले आहे. त्यामुळे येत्या महिनाभरात ही गावे समाविष्ट होण्याबाबतची शक्यता व्यक्त केली जात आहे.