सध्या 45 रुग्णांवर उपचार : आता नव्यांना प्रवेश नाही
पुणे – सीओईपी मैदानावरील जम्बो हॉस्पिटल 22 जूनपासून बंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. पण, तो तूर्त स्थगित करण्यात आला आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी दिली.
“जम्बो’ हॉस्पिटल येथे दि.8 जूनपासूनच नवे रुग्ण घेणे बंद करण्यात आले. सध्या येथे 45 रुग्णांवर उपचार सुरू असल्याने आणखी एक ते दोन आठवडे हे हॉस्पिटल नवीन रूग्णांना प्रवेश न देता सुरूच ठेवले जाणार आहे. आहे. तर, आयसीयूचे 50 बेड कार्यान्वित ठेवण्यात येणार आहेत.
शहरातील करोना रुग्णसंख्या घटल्याने तसेच नवीन रुग्णही दाखल होणे बंद झाल्याने महापालिकेने 1 जून रोजी या रुग्णालयातील 300 ऑक्सिजन खाटा कमी केल्या होत्या. त्यानंतर आठवडाभराने आणखी 100 खाटा कमी करण्यात आल्या. केवळ 300 खाटा कार्यान्वित ठेवण्यात आल्या होत्या. त्यावेळी 100 रुग्ण उपचार घेत होते.
हे रुग्ण 22 जूनपर्यंत बरे होऊन घरी जातील, तसेच जे रुग्ण राहतील त्यांना इतर रुग्णालयात नेऊन जम्बो रुग्णालय बंद करणात येणार होते. मात्र, आता तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आल्याने, तसेच या ठिकाणी असलेल्या काही रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने या ठिकाणी 50 आयसीयू तसेच एचडीयू बेड तूर्त सुरूच ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यातील काहींना उपचारासाठी आणखी 10 ते 12 दिवसांचा कालावधी लागू शकतो, ही बाब लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.