* पुणे विद्यापीठ सुधारणार प्रश्नसंचाचा दर्जा
* काठिण्य पातळीही उंचावण्यात येणार
पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी झालेल्या पहिल्याच ऑनलाइन परीक्षेत प्रश्नांची काठिण्यपातळी कमी होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचा निकाल वाढल्याचे दिसून आले. त्या पार्श्वभूमीवर पुढच्या महिन्यात होणाऱ्या विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेत प्रश्नसंचाचा दर्जा सुधारण्यावर भर देण्यात येणार असून, काठिण्य पातळीही उंचावण्यात येणार आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या द्वितीय सत्राच्या ऑनलाइन परीक्षेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा कस लागणार आहे.
पहिल्यांदाच झालेल्या ऑनलाइन परीक्षेतील अनुभव लक्षात घेता विद्यापीठाची गुणवत्ता आणि दर्जा कायम राखण्याचे मोठे आव्हान उभे राहिले होते. त्यादृष्टीने ऑनलाइन प्रश्नसंचाचा दर्जा उंचावणे महत्त्वाचे आहे, यादृष्टीने विद्यापीठाने पाऊल उचलले. त्यासाठी विशेषत: विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील अभ्यास मंडळाच्या सदस्यांना प्रश्नसंच तयार करताना त्याचा दर्जा सुधारण्यावर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यापद्धतीचे गाईडलाइन सांगितले गेले.
विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देत असताना त्यांना विचार करण्याजोगे प्रश्न असणार आहेत. त्या पद्धतीने प्राध्यापक प्रश्नसंच तयार करीत असल्याची माहिती विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर यांनी दिली.
विद्यापीठाच्या द्वितीय सत्राची परीक्षा जुलैमध्ये सुरू होत आहे. त्यासाठी प्राध्यापकांकडून प्रश्नसंच तयार करण्यात येत आहे. या प्रश्नसंचासाठी प्राध्यापकांना कार्यशाळा, परिषद, बैठकातून मार्गदर्शन करण्यात येत आहे.
अभ्यास मंडळाचे सदस्यांनीही योग्य पद्धतीने आणि वेळेत प्रश्नसंच तयार होण्यासाठी पुढाकार घेत आहेत. त्यामुळे यंदा गतवर्षीच्या तुलनेत प्रश्नसंचाची मर्यादा अर्थात संख्याही वाढणार आहे. पर्यायाने गुणवत्तापूर्वक प्रश्नसंच उपलब्ध होतील, असा विश्वास डॉ. चासकर यांनी व्यक्त केला.
दरम्यान, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अंतर्गत येणाऱ्या विज्ञान शाखेच्या अंतिम वर्ष तथा सत्राच्या परीक्षेसाठी 70 टक्के अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला आहे. ही परीक्षा एमसीक्यू म्हणजेच बहुपर्यायी प्रश्न या पद्धतीने होणार आहे. प्राध्यापकांनी यंदा अन्य संदर्भ पुस्तकांचा अभ्यास करून प्रश्नसंच तयार केले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देत असताना योग्य पद्धतीने अभ्यासाची तयारी करणे क्रमप्राप्त ठरणार आहे.
ऑनलाइन प्रात्यक्षिक परीक्षा यशस्वी ठरली
विद्यापीठाने पहिल्या व द्वितीय सत्रातील प्रात्यक्षिक परीक्षा करोनाच्या पार्श्वभूमीवर ऑलनाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला. प्रात्यक्षिक परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेणे, हे प्रारंभी अडचणीचे वाटत होते. मात्र, प्राध्यापकांनी अभ्यासपूर्वक प्रात्यक्षिक परीक्षेचे ई-कंटेन्ट साहित्य उपलब्ध केले. त्याचाच परिणाम म्हणून पहिल्याच प्रयत्नात प्रात्यक्षिक परीक्षा यशस्वीपणे घेता आली. याचे सर्व श्रेय प्राध्यापकांचे आहे, असेही डॉ. मनोहर चासकर यांनी सांगितले.