पुणे – साउंड सिस्टीमच्या भिंती उभारून दणदणाटाने सर्वसामान्य नागरिक, वयस्कर तसेच आजारी नागरिकांचा शांतीपूर्वक जगण्याचा हक्क हिरावून घेतला जात आहे. फक्त गणेशोत्सवच नव्हे तर प्रत्येक सण, जयंती, पुण्यतिथीनिमित्त रस्ते अडवले जात आहेत.
पुण्यात यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत तर स्पीकरबाबतचे सर्व नियम धाब्यावर बसवले गेले. कर्णकर्कश स्पीकरच्या दणदणाटामुळे अनेकांना आरोग्य समस्यांचा सामना करावा लागला. एकूणच ही सगळी परिस्थिती विषण्ण करणारी असून या विरोधात जागृत पुणेकर म्हणून कायदेशीर मार्गाने लढा देण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली जाणार आहे.
माजी महापौर अंकुश काकडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. काकडे यांच्यासह स्थायी समितीचे माजी अध्यक्ष ऍड. श्रीकांत शिरोळे, माजी उपमहापौर डॉ. सतीश देसाई, खासदार शरद पवार यांचे माजी स्वीय सहायक प्रल्हाद भागवत आणि महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर यांच्या वतीने ऍड. शिरोळे येत्या आठवड्यात ही याचिका दाखल करणार आहेत.
यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत कोणतेही निर्बंध पाळले गेले नाहीत. पोलिसांनाही बघ्याची भूमिका घेत कारवाई केली नाही. मनात आणले तर पोलीस काय करू शकतात, हे तोरण मिरवणुकांवर घातल्या गेलेल्या बंदीतून स्पष्ट होते. त्यामुळे कायद्याचे पालन न करणाऱ्या मंडळांबरोबरच, पोलिसांवरही कारवाई व्हावी, अशी मागणी आम्ही करणार आहोत, असे काकडे म्हणाले.
या वेळी विसर्जन मिरवणुकीवेळी स्पीकरचा आवाज किती होता, याची माहिती आम्ही संकलित करत आहोत. पोलिसांकडून आवाजाची माहिती तसेच लेझर लाइटमुळे डोळ्यांना इजा झालेल्या पोलिसांची माहिती आम्ही पोलिसांकडे मागितली आहे. अद्याप ही माहिती आम्हाला मिळालेली नाही. ही माहिती संकलित करून तातडीने जनहित याचिका दाखल केली जाईल, असे काकडे म्हणाले.
“आम्ही कोणत्याही विशिष्ट धर्माविरोधात नाही. सर्वच धर्मातील अनिष्ट प्रथेविरोधात आवाज उठवत आहोत. न्यायालयाचा आदेश सर्वांनाच पाळावा लागेल. ” – अंकुश काकडे, माजी महापौर