नगर – पावसामुळे रखडलेल्या नगर शहरातील रस्त्यांच्या कामांना आता लवकरच सुरूवात होणार असल्याची माहिती महापौर रोहिणी शेंडगे यांनी दिली. शहरात मोठ्या प्रमाणावर कामे मंजूर झालेली आहेत. त्याचे कार्यारंभ आदेशही देण्यात आलेले आहेत. पावसामुळे ही कामे थांबविण्यात आली होती. मात्र आता पावस थांबल्याने या रस्त्यांची कामे सुरू करण्याचा नियोजन महापालिकेने केले आहे.
नगर शहर व उपनगर भागात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यापूर्वी शहर व उपनगरात काही रस्त्यांची कामे मार्गी लागली आहेत. त्यानंतर पावसाळ्यामुळे डांबरीकरणाची कामे थांबली होती. सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर काही रस्त्यावर खड्डे बुजवले गेले. मात्र, पावसामुळे पुन्हा दुरवस्था झाली आहे. आता शहरात अनेक रस्त्यांची कामे मंजूर झालेली आहेत. त्याचा आढावा घेऊन लवकरात लवकर कामे मार्गी लावण्यासाठी नियोजन केले जाईल.
शहराच्या मध्यवर्ती भागातही काही रस्त्यांची कामे मंजूर आहेत. महापालिकेमार्फत सुरू असलेली कामे मार्गी लावली जातील. तसेच मोठ्या प्रमाणात मंजूर असलेली कामे ही शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत होणार आहेत. त्यांच्याशी संपर्क साधून सदर कामे तातडीने मार्गी लावण्याचा सूचना दिल्या जातील, असे महापौर शेंडगे यांनी सांगितले. त्यामुळे लवकरच नगर शहरातील रस्त्यांची कामे आता सुरू होणार आहेत. खासदार, आमदार निधीतील कामे मोठ्या संख्येने आहेत.