कॉफी शॉपमध्ये अश्लील चाळ्यांना ऊत ; सीसीटीव्ही पण नाहीत
अमोल बनकर
सासवड –सासवड शहरातल्या विविध कॉफीशॉपमध्ये कॉलेज विद्यार्थ्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. याला कारण आहे. कॉफी शॉपमध्ये मिळणारा एकांत. काही कॉफी शॉपमध्ये मोठ्या प्रमाणावर अश्लील चाळे होत असल्याचे प्रकारही समोर आले आहेत. यामध्ये अल्पवयीन मुलांची संख्या देखील जास्त असल्याची चर्चा सध्या पुरंदरमध्ये आहेत. नियमबाह्य कॉफी शॉपवर कारवाई होणे गरजेचे आहे. तर तालुक्यातील कॉफी शॉपधारकांसाठी नियमावली देखील तयार करणे आता गरजेचे आहे.
सासवड शहरातील कॉफी शॉप चालकांनी काळ्या काचा लावलेल्या आहेत. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे सीसीटीव्ही लावलेले नाहीत. प्रेमीयुगलांना एकांत मिळावा यासाठी काही कॉफी शॉप विशिष्ट रचना केली आहे. मंद प्रकाश आणि संगीताची सुविधा पुरवण्या बरोबरच त्याठिकाणी कोणी येणार नाही याची पूर्ण दक्षता घेतली जाते.
कॉफी आणि नाष्ट्याचे पैसे ते वेगळे घेतात. पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अश्लील चाळे केले जात असल्याची चर्चा सध्या रंगत आहे. अनेक अल्पवयीन तरुण-तरुणी या कॉफी शॉपमध्ये येत असतात. इथेच त्यांना नको त्या सवयी लागतात. तरुणांमध्ये वाढणाऱ्या नशेचे कारणही हे कॉफी शॉप ठरत असल्यामुळे याबाबत जनसामान्यांमध्ये प्रचंड रोष आहे.
ही नियमावली गरजेची
कॉफी शॉपसाठी नियमावली असणे गरजेचे असून यामध्येमध्ये सीसीटीव्ही अनिवार्य आसणे, सर्वांचे चेहरे नीट दिसतील अशी प्रकाश योजना आणि बैठक व्यवस्था असणे आवश्यक आहे, स्वतंत्र कंपार्टमेंट करण्यात येऊ नाहीत, कॉफी शॉपमध्ये अंधार करता येणार नाही. धूम्रपनास बंदी घालणे अशा नियमावली जिल्हा प्रशासनाकडून करणे गरजेचे आहे.
शहरामध्ये ज्यांनी परवाना घेऊन कॉफी शॉप सुरू केले आहेत. या परवानेचे निकषाचे उल्लंघन केल्यास परवाना हा रद्द करण्यात येईल. त्याचबरोबर ज्या कॉफी शॉपचालकांनी परवानगी घेतलेली नाही अशा लोकांवर कारवाई देखील होऊ शकते.
– मोहन चव्हाण, आरोग्य विभाग सासवड नगरपरिषद
हॉटेल परवाने हे स्थानिक प्रशासन देत असल्यामुळे हा विषय आमच्या अखेरकेतला नाही.
– विक्रम राजपूत, तहसीलदार पुरंदर
सर्व कॉफी शॉपची पाहणी करणार आहोत. यात दोशी आढळल्यास त्या शॉपचालकांवर कारवाई करण्यात येईल.
– संतोष जाधव, पोलीस निरीक्षक, सासवड