पुणे -करोनाकाळात रुग्णांच्या हद्दीचा वाद न घालता महापालिकेने स्वखर्चातून उभारलेल्या सीओईपी महाविद्यालयाच्या मैदानावरील जम्बो कोविड रुग्णालयात 23 मार्च ते 23 एप्रिल या एका महिन्यात महापालिका हद्दीबाहेरील तब्बल 650 रुग्णांवर मोफत उपचार केले. तर, पुणे शहरातील 1600 रुग्णांवर उपचार केले आहेत. तर, या कालावधीत या रुग्णालयात एकूण सुमारे 2,250 रुग्णांवर उपचार केले आहेत.
त्यामुळे, ही आकडेवारी पाहता तब्बल 30 टक्के रुग्ण हे पुण्याबाहेरील आहेत. त्यामुळे, आलेल्या रुग्णाचा जीव वाचविणे हाच एक उद्देश ठेऊन महापालिकेने अनेकांचे जीव वाचवत मनाचा मोठेपणा दाखविला आहे. दरम्यान, जम्बोमध्ये एका रुग्णाच्या उपचारासाठी सरासरी 60 हजार रुपयांचा खर्च येत असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.
शहरात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून करोनाची दुसरी लाट सुरू झाली. मार्चच्या सुरूवातीलाच दैनंदिन बाधितांचा आकडा दोन हजारांच्यावर गेला होता. तर, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात विक्रमी सात हजार बाधित सापडले होते.
शहरात मार्च महिन्यातच रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढण्यास सुरुवात झाल्याने शहरातील खासगी रुग्णालयातही बेड मिळणे अडचणीचे बनले होते. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने तातडीने जम्बो हॉस्पिटल सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी स्थायी समितीनेही तत्काळ 75 कोटींच्या खर्चास मान्यता दिल्यानंतर 23 मार्चपासून हे हॉस्पिटल सुरू झाले. सुरुवातीला 200 बेडची सुविधा सुरू केली होती.
त्यानंतर त्यात टप्प्याटप्प्याने वाढ करत या ठिकाणी आता तब्बल 800 रुग्णांची व्यवस्था आहे. हे हॉस्पिटल शहरातील रुग्णांसाठी सुरू केले असले तरी, जम्बो सुरू होताच, आसपास जिल्ह्यांमध्ये तसेच पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातही या साथीचे रुग्ण वाढत होते.
त्यामुळे गंभीर रुग्णांना उपचारासाठी बेड मिळत नसल्याने अनेक रुग्णांनी आधी खासगी हॉस्पिटल आणि नंतर जम्बोमध्ये उपचारासाठी धाव घेतली. मात्र, महापालिकेनेही रुग्णाचे गाव अथवा तो कोणत्या जिल्ह्यातील आहे हे न पाहता उपचार करण्यास प्राधान्य दिले. मात्र, त्याचवेळी, शहरातील नागरिकांना उपचारासाठी बेड मिळत नसल्याने महापालिकेस टिकेचा सामना करावा लागला असला तरी आधी महापालिकेने रुग्णाची हद्द न पाहता मनाचा मोठेपणा दाखवत हद्दीबाहेरील रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत.