Baramati Lockdown : बारामती शहरातील रस्ते निर्मनुष्य

चौका-चौकात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात

बारामती/ जळोची  -वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्‍वभूमीवर बारामतीत बुधवार (दि.5) मध्यरात्रीपासून सात दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार बारामती शहरात अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व आस्थापना कडकडीत बंद आहेत. शहरातील वर्दळीचे सर्व रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. त्यामुळे शहरात एकप्रकारे नीरव शांतता दिसत आहे. करोना महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी संपूर्ण यंत्रणा एकवटली आहे. त्यामुळे महामारीवर नियंत्रण मिळवू, असा विश्‍वास अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केला आहे.

शहरातील रस्त्यांवर अत्यावश्‍यक सेवा वगळता एकही वाहन व नागरिक रस्त्यावर फिरताना दिसून येत नाही. स्थानिक प्रशासनाने लागू केलेल्या टाळेबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी शहरात ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. तसेच शहरातील मुख्य रस्त्यांवर ठीकठिकाणी बॅरिगेट लावण्यात आले आहे. बारामतीतील रुग्णसंख्या आटोक्‍यात आणण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात होत्या.

मात्र, तरीही रुग्णसंख्या कमी होत नसल्याने प्रशासनाने टाळेबंदीचा निर्णय घेतला आहे. टाळेबंदीच्या कठोर अंमलबजावणीसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये 1 उपविभागीय पोलीस अधिकारी, 12 अधिकारी व 120 कर्मचारी, राज्य राखीव दलाची तुकडी व 40 होमगार्ड, असा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी दिली.

बारामती शहरासह तालुक्‍यात नीरव शांतता
बारामती शहरासह तालुक्‍यात नीरव शांतता दिसत आहे. सकाळपासून काटेकोरपणे पालन करण्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा एकवटली आहे. त्याचा परिणाम आज शहरात दिसून आला. त्यामुळे महसूल, आरोग्य यंत्रणेवरील ताण थोडासा हलका झाला आहे. सकाळी दोन तास जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा केला होता. त्यामुळे नागरिकांनी यावेळेतच खरेदी केली. त्यामुळे संपूर्ण शहर खऱ्या अर्थाने लॉक झाले होते.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.