सातारा – मराठा आरक्षण रद्द केल्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर साताऱ्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या पोवई नाका परिसरातील निवासस्थानासमोर आज अज्ञाताने शेणी पेटवून दिल्या. या घटनेनंतर हा प्रकार मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे अज्ञातांनी केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या प्रकारानंतर साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेस भवनावर अज्ञात व्यक्तींनी सकाळी दगडफेक केली. ही घटना भवनाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. या दगडफेकीवेळी काचांचा आवाज आल्यामुळे भवनातील कार्यकर्ते बाहेर आले. त्यामुळे गेटवरून उडी मारून संबंधित पळून गेल्याचे निदर्शनास आल्याचे तेथील प्रत्यक्षदर्शीने सांगितले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पहाणी केली. यामुळे सातार्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटण्याची शक्यता दिसून येत आहे.
दरम्यान, मराठा आरक्षण रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अज्ञातांने हा प्रकार केला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकारानंतर गृहराज्यमंत्र्यांच्या घरासमोर घडलेल्या प्रकाराची अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी पहाणी केली. तसेच अधिक तपासासाठी पोलिसांना सूचना केल्या आहेत.