प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 3 -राज्यात गडचिरोली जिल्ह्यांपेक्षा पुणे जिल्ह्यात अवघड क्षेत्रातील शाळांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेसाठी अवघड क्षेत्रातील शाळांची संख्याही 928 निश्चित करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात मावळ, मुळशी, खेड, जुन्नर, आंबेगाव या तालुक्यांमधील शाळा सर्वाधिक अवघड क्षेत्रात आहेत. तर बारामती, दौंड, हवेली, इंदापूर आणि शिरूर या तालुक्यांतील सर्व शाळा सोप्या-सरळ क्षेत्रामध्ये आहेत.
दरम्यान, बदल्यानंतर शिक्षकांना दुर्गम अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये अध्यापन करणे बंधनकारक असल्याने शिक्षकांसाठी सर्वाधिक शाळा या “अवघड’च ठरणार आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक अवघड ठिकाणच्या शाळा मावळ तालुक्यात 171 त्या पाठोपाठ खेड तालुक्यात 138, मुळशीमध्ये 128 तसेच जुन्नरमध्ये 112 तर आंबेगाव तालुक्यात 110 शाळांचा समावेश आहे. दरम्यान, जिल्हा परिषद शिक्षकांच्या नियतकालिक बदल्या आता नव्याने विकसित केलेल्या “ऍपद्वारे ऑनलाइन’ होणार आहेत. या बदली प्रक्रियेसाठी जिल्हा परिषदेने “अवघड क्षेत्रे’ असणाऱ्या शाळांची यादी आणि संख्या निश्चित केली आहे.
महापलिकेत समाविष्ट गावांतील शिक्षक…
पुणे शहरानजीकच्या 23 गावांचा महापालिकेत समावेश झाला आहे. त्या गावांतील शिक्षकांना महापालिकेतील शाळांमध्ये समावेश करून घेण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे. मात्र, जिल्हा परिषद प्रशासनाने या 23 ठिकाणच्या शाळांमधील 584 शिक्षकांना पुन्हा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये समाविष्ट करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील रिक्त ठिकाणच्या शाळांमध्ये या शिक्षकांची बदली होणार आहे. या निर्णयाविरोधात शिक्षकांनी महापालिकेच्या शाळांमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी न्यायालयात धाव घेतली आहे.