मंचर, दि. 3 (प्रतिनिधी)- शिवसेना पक्षाने माझ्यावरील कारवाई मागे घेतली असली तरी माझ्यावर एवढी मोठी कारवाई कशी केली? याबाबत खूप वाईट वाटले अजून पक्षात माझी किती किंमत आहे, हे यावरून कळते. शिवसेना पक्षाबरोबर मी प्रामाणिक राहूनही माझं काय चुकलं, असा उद्विग्न सवाल करत शिवसेना पक्षाचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या निमंत्रणानुसार मंगळवारी (दि. 5) मुंबई येथे भेटणार असल्याचे शिवसेनेचे उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी रविवारी सांगितले.
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपल्या लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शरद सोनवणे, जिल्हा परिषद गट नेते देवीदास दरेकर, तालुकाप्रमुख अरुण गिरे, रवींद्र करंजखिले, सागर काजळे, प्रवीण थोरात पाटील, अशोक बाजारे, राम तोडकर, सचिन बांगर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी झाल्याची बातमी विविध वाहिन्या, न्यूज पोर्टल यावर प्रसारित होताच आढळराव पाटील हे शिवसेनेत असून त्यांची हकालपट्टी करण्यात आली नसल्याचे पत्र शिवसेनेकडून जाहीर करण्यात आले आहे. या पत्रकात दि. 3 जुलै 2022 शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या “सामना’मध्ये आलेली बातमी ही अनवधनाने प्रसिद्ध आलेली असून शिवाजीराव आढळराव-पाटील हे शिवसेना उपनेते म्हणून शिवसेनेतच कार्यरत आहेत. अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. आढळराव पाटील म्हणाले की, मी गेली 18 वर्षे पक्षासाठी काम करत असून माझ्यावर झालेल्या कारवाईचे वृत्त ऐकून अतिशय वाईट वाटले.
मी खासदार नसतानाही स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन मतदारसंघात फिरत आहे आणि फिरत राहील; परंतु माझ्यावरील कारवाई मागे घेतली असली तरी पक्षात माझी काय किंमत आहे हे यावरून कळते. महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर मी सातत्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विरोधात भूमिका मांडत असल्याने ही वेळ माझ्यावर आली असावी, मला यावेळी काय बोलावे कळत नाही, असे आढळराव यांनी नमूद केले.