पुणे (गणेश आंग्रे) – पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत इमारतींमधील सदनिका तसेच बेकायदा प्लॉटिंगची दस्तनोंदणी केल्याचे तब्बल 10 हजार 561 दस्त आढळले आहेत. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर खडबडून जागे झालेल्या राज्य शासनाने अशा गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून दर तीन महिन्यांनी प्रत्येक दुय्यम निबंधक कार्यालयांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतच्या सूचना लवकरच नोंदणी व मुद्रांक विभागाला दिल्या जाणार आहेत. त्यामुळे दस्तनोंदणी करणाऱ्या दुय्यम निंबधकांवर वचक राहणार आहे. तसेच नियमबाह्यपणे दस्त नोंदविले असल्यास ते उघडकीस येणार आहे.
शहरालगतच्या गावांमध्ये तसेच आता ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये बेकायदा प्लॉटिंगचे पेव फुटले. यातून अशा व्यवहारांची दस्तनोंदणी झाली आहे. शहरात रेरा कायद्याचे उल्लंघन करून दस्त नोंदणी झाल्याबाबत तक्रारी राज्य शासनाकडे करण्यात आल्या होत्या. त्यानुसार शहरातील 27 दुय्यम निबंधक कार्यालयांमधील मागील तीन वर्षांत नोंदविलेल्या सुमारे एक लाख दस्तांची तपासणी सुरू करण्यात आली होती. तपासणी पथक हे राज्य शासनाने नेमले होते. या तपासणीमध्ये काही दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये नियमबाह्यपणे दस्तांची नोंदणी झाल्याचे दिसून आले आहे. रेरा कायद्याचे उल्लंघन करून तब्बल 10 हजार 561 दस्तनोंदणी केल्याचे आढळून आले आहे. हा तपासणी अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्यात आल्यानंतर शासनाने दोषी आढळणाऱ्या 44 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
दस्त नोंदणी कार्यालयातील दुय्यम निबंधकांवर वचक राहावा, नियमबाह्यपणे दस्त नोंदविले जाऊ नये, यासाठी दर तीन महिन्यांनी या कार्यालयांची तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती महसुल विभागातील मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. याबाबतच्या सूचना नोंदणी महानिरिक्षक यांना दिल्या जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच, या तपासणीमध्ये चुकीचे काही आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.
एका गुंठ्याचीही दस्तनोंदणी
राज्य शासनाने अनधिकृत बांधकामांची दस्त नोंदणी करू नये, असे आदेश दिले आहेत. तसेच संबंधित बांधकाम प्रकल्पाची नोंदणी रेरा प्राधिकरणाकडे करून रेरा क्रमांक दस्तामध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे. अशा स्पष्ट सूचना असतानासुद्धा दुय्यम निबंधकांनी बेजाबदारपणे रेरा क्रमांक नसलेल्या बांधकाम प्रकल्पांमधील दस्तांची नोंदणी केली. जमिनीचे तुकडे पाडून त्याची विक्री करण्यास मनाई असतानासुद्धा एक-एक गुंठ्यांची दस्तनोंदणी करण्यात आल्याचे उघड झाले आहे.