पुणे – पैशाच्या देवाणघेवाणीच्या कारणावरून समीर उर्फ लालबादशाह हुसेन मनूर याच्यावर गोळ्या झाडून त्याचा खून केल्याप्रकरणी अटक केलेल्या चौघांच्या पोलीस कोठडीत 18 डिसेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
मेहबूब सैफान बलुरगी बलुरगी (वय 33, रा. जनता वसाहत), सुफियान फयाज चौरी (वय 19, रा. लक्ष्मीनगर), निलेश सुनिल कुंभार (वय 30, रा. भेकराईनगर) आणि अलताफ मुस्तफा बलुरगी (वय 40, रा. बिबवेवाडी), अशी पोलिस कोठडीत वाढ झालेल्यांची नावे आहेत. ही घटना 6 डिसेंबर रोजी दुपारी बाराच्या सुमारास आंबेगाव बुद्रुक येथील चंद्रभागा चौकात घडली होती.
या चारही आरोपींच्या पोलिस कोठडीची मुदत मंगळवारी संपल्याने, त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी त्यांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी सहायक सरकारी वकील योगेश कदम यांनी केली. आरोपी मेहबूब व अलताफ याने एका मध्यस्थाकडून एक पिस्तूल व नऊ काडतुसे विकत घेतल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यापैकी सहा काडतुसे आरोपींनी समीरवर झाडली असून, उर्वरित तीन काडतुसे हस्तगत करण्यासाठी आरोपींकडे तपास केला जाणार आहे.
याशिवाय मेहबूब व समीरने सासवड येथे एकत्रित जमीन खरेदी केली होती. या जमिनीच्या व्यवाहाराबाबत तपास करायचा आहे. मेहबूब हा व्याजाचा धंदा व भिशी चालविण्याचा व्यवसाय असून, त्या अनुषंगाने काही हेवेदावे झाले होते का, याचाही तपास करायचा आहे. त्यासाठी आरोपींची पोलीस कोठडी वाढविण्याची मागणी सरकारी वकील कदम यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.