सातारा – कराड दक्षिण, उत्तर आणि पाटण या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण आठ लाख 94 हजार 799 मतदार आहेत. त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघाचा खासदार निवडून देण्यात हे मतदारसंघ निर्णायक भूमिका बजावणार आहेत. त्यामुळे महायुतीचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांनी सध्या या तीन मतदारसंघांमध्ये गाठीभेटी, बैठका, लग्नसमारंभ, वास्तुशांती कार्यक्रमांना उपस्थिती, पारावरील अनौपचारिक गप्पा अशा कार्यक्रमांचा धुरळा उडवून दिला आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून खासदार उदयनराजे भोसले हे इच्छुक असून, त्यांच्या उमेदवारीवर वरिष्ठ पातळीवर अद्याप खल सुरू आहे, महाविकास आघाडीने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांना रिंगणात उतरवले आहे. या दोघांनीही कराड दक्षिण, उत्तर आणि पाटण या विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रचाराचा भर दिला आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारीचा सस्पेन्स कधी नव्हे एवढा ताणला गेला आहे. आपणच महायुतीचे उमेदवार असल्याच्या थाटात उदयनराजे यांनी प्रचार सुरू ठेवला आहे. उमेदवारीबाबतची चर्चा बाजूला ठेवून, ते गेल्या पंधरा दिवसांपासून कराड दक्षिण, उत्तर आणि पाटण या मतदारसंघांचा कानाकोपरा पिंजून काढत आहेत. महाविकास आघाडीच्या आमदार शशिकांत शिंदे यांनी कराड येथे प्रीतिसंगमावर यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेत प्रचाराला प्रारंभ केला. सातारा लोकसभा मतदारसंघातील एकूण मतदारांच्या एक तृतीयांश मतदार सातारा-जावळी, वाई-महाबळेश्वर-खंडाळा, कराड उत्तर, कराड दक्षिण, पाटण या विधानसभा मतदारसंघांपैकी कराड दक्षिण, उत्तर आणि पाटण या मतदारसंघांमध्ये आहेत.
तेथील आठ लाख 94 हजार 799 मतदार यावेळी मतदान करणार आहेत. त्यामुळे महायुती व महाआघाडीची राजकीय रस्सीखेच या मतदारसंघांमध्ये पाहायला मिळत आहे. कराड दक्षिणमध्ये भाजपच्या डॉ. अतुल भोसले यांनी गेल्या दोन वर्षांत चांगलीच पायाभरणी केली आहे. काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनाही मानणारा मोठा मतदारवर्ग आहे. कराड उत्तरमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार बाळासाहेब पाटील यांचा वरचष्मा आहे. मनोज घोरपडे यांनीसुद्धा ‘जनसंवाद’, ‘एक बूथ’ या माध्यमातून भाजपची ताकद निर्माण केली आहे. पुसेसावळीच्या धैर्यशील कदम यांना जिल्हाध्यक्षपद देत, भाजपने कराड उत्तरमध्ये राष्ट्रवादीला तगडी टक्कर मिळण्याची तजवीज केली आहे. पाटणमध्ये पालकमंत्री शंभूराजे व माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर यांच्या राजकीय बलाबलाची रस्सीखेच आहे. महाविकास आघाडी व महायुती यांच्यामधील राजकीय संघर्ष प्रामुख्याने या तीन मतदारसंघांमध्ये पाहायला मिळणार आहे.
या मतदारसंघांचे महत्त्व ओळखून उदयनराजे व आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रचार आणि गाठीभेटींवर भर दिला आहे. गेल्या निवडणुकीत श्रीनिवास पाटील यांना सहा लाख 37 हजार 620, तर उदयनराजेंना पाच लाख 48 हजार 903 मते मिळाली होती. पाटील यांना कराड व पाटणमध्ये तीन लाख 40 हजार, तर उदयनराजेंना दोन लाख 29 हजार मते मिळाली होती. या मतदारसंघांमध्ये पाटील यांनी एक लाख दहा हजार 587 एवढे मताधिक्य मिळवले होते. सातारा विधानसभा मतदारसंघात उदयनराजेंना एक लाख 18 हजार 898, तर पाटील यांना 72 हजार 847 मते मिळाली होती. त्यामुळे सातारा आणि जावळी येथील मूळचे असणारे उदयनराचे व शशिकांत शिंदे हे निर्णायक आघाडीसाठी कराड दक्षिण, उत्तर आणि पाटण या मतदारसंघांवर अवलंबून राहणार आहेत. या मतदारसंघांमध्ये सूक्ष्म नियोजन तयार असल्याचे उदयनराजेंनी जाहीर केले आहे, तर या मतदारसंघांमध्ये आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रचाराचे मुद्दे काय असणार, हे पुढच्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे.
============