पुणे – महिलांना घरगुतीकरणातून बाहेर काढून व्यवसायिकतेकडे नेण्याची गरज असून, त्यासाठी महिला व्यावसायिक व बचत गटांसाठी व्यवसाय मार्गदर्शन व मदतकेंद्र कोथरूड परिसरात उभे करावे. त्यासाठी डाॅ. मेधा कुलकर्णी यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.
मुक्तछंद तर्फे स्वयंरोजगाराचा धागा विणणार्या पुण्यातील महिला उद्योजकांच्या उत्पादन प्रदर्शनाचे उद्घाटन उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. या केंद्रासाठी आमदार निधीतून १० लाख रूपये देण्याची घोषणा त्यांनी केली. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, आमदार माधुरी मिसाळ, अभिनेत्री शिल्पा तुळसकर आणि प्रदर्शनाच्या मुख्य संयोजक, माजी आमदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, अनिता तलाठी, गौरी करंजकर, सुनिषा शहा उपस्थित होत्या. दि. 9 ते 11 फेब्रुवारी दरम्यान सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत राजाराम पुलाजवळील मजेंटा लाॅन्स याठिकाणी हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे.
माधुरी मिसाळ म्हणाल्या, महिलांचे सबलीकरण अशी उक्ती पूर्व सर्वत्र वापरण्यात येत होती. मात्र, ही उक्ती चुकीची असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगून, महिला ही स्वत: शक्ती, उर्जा असून, तिचे सबलीकरण करण्याची गरजच नाही. तिला फक्त आत्मविश्वास देण्याची आवश्यकता आहे. रूपाली चाकणकर म्हणाल्या, व्यवसाय करणार्या महिलांनी आत्मसंतुष्ट न रहाता मुक्तछंदच्या या व्यासपीठाचा उपयोग आपल्या व्यवसायाची प्रगती करण्यासाठी करून घ्यावा. व्यवसायाची प्रगती म्हणजेच त्या कुटुंबाची प्रगती असते. शिल्पा तुळसकर यांनी उद्योजक महिलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांच्या मागे पुरूषांनी उभे रहावे असे आवाहन केले.
प्रास्ताविकात बोलताना प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, महिलांमधील क्षमता, कौशल्य हे त्यांच्या व्यवसायातून दिसते. अशा महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही मुक्तछंदतर्फे प्रदर्शने भरवतो. त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठीही प्रयत्नशील असतो. योजनांची महिती देतो. प्रदर्शनासाठी माजी नगरसेवक जयंत भावे, कल्पना पुरंदरे यांनी सहकार्य केले.
मयूर हटाळे, गणेश कडू, अपर्णा लोणारे, गणेश पासलकर, शुभांगी जोशी यांचे परिश्रम आहे. तर सूत्रसंचल बाळकृष्ण नेरूरकर यांनी केले. यावेळी साडी ड्रेपींग विषयावर कार्यशाळा झाली. प्रदर्शनात महिला उद्योजकानी तयार केलेल्या विविध नाविऩ्यपूर्ण साड्या, कुडतीज, ड्रेस मटेरियल, हँण्डमेड पर्सेस – बॅग्ज, दागिने, हस्तकला वस्तू, सौंदर्य प्रसाधने, खवैय्य पुणेकरांसाठी पुण्यातील निवडक अन्नपूर्णांचे खाद्य पदार्थांचे स्टॉल्स आहेत.