पुणे –महाराष्ट्र शिक्षण सेवा (शिक्षण सक्षमीकरण शाखा) संवर्गातील प्राचार्य, ज्येष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता या पदांसाठीच्या विभागीय परीक्षांच्या तरतुदीमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
संबंधित संवर्गातील अधिकाऱ्यांना परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक प्रश्नपत्रिकेतमधील एकुण गुणांच्या 50 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. एखाद्या विशिष्ट प्रश्नपत्रिकेत सूट मिळण्याच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या पण कोणत्याही विषयामध्ये 60 किंवा त्याहून अधिक गुण प्राप्त केलेल्या उमेदवारास त्यानंतरच्या त्या प्रश्नपत्रिकेसाठी परीक्षा देण्यापासून व उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्याची तरतूद केली आहे.
सामान्य प्रशासन विभागाच्या 31 मार्च 2021 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे राज्य शासनाच्या विविध प्रशासकीय विभागांच्या विभागीय परीक्षा संदर्भातील सामाईक बाबींचे धोरण निश्चित केले आहे. या शासन निर्णयाद्वारे विभागीय परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये नमूद केलेल्या सर्व विषयांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारास प्रत्येक विषयात किमान 50 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहणार आहे, अशी तरतूद केली आहे. परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांचे नुकसान होऊ नये यासाठी तरतुदीत सुधारणा केली आहे.
आता परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारास विभागीय परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी अभ्यासक्रमातील प्रत्येक विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील एकूण गुणांच्या 50 टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे. अनुत्तीर्ण उमेदवाराने त्या प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील 50 टक्के व त्याहून अधिक गुण मिळविले असतीत तर त्या उमेदवारास त्यानंतरच्या प्रयत्नात त्या विषयाच्या प्रश्नपत्रिकेसाठी परीक्षा देण्यापासून व उत्तीर्ण होण्यापासून सूट दिली आहे.