खडकवासला –डोणजे येथे पथदर्शी कचरा प्रक्रिया प्रकल्पाला कचरा देण्याऐवजी हॉटेल्स, फार्म हाऊस, वृद्धाश्रम आणि वेलनेस सेंटर्सचा कचरा आणि सांडपाणी हे ओढ्यात सोडण्यात येत आहे. कचरा व्यवस्थापनासाठी ग्रामपंचातीने आवाहन करूनही दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित हॉटेल आणि संस्थांवर कडक कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. करण्यात आली आहे.
डोणजे परिसरात दीडशेच्या वर हॉटेल फार्म हाऊस वृद्धाश्रम आहेत. जलप्रदूषण टाळण्यासाठी डोणजे ग्रामपंचायतीने कचरा व्यवस्थापनासाठी घंटागाडीची व्यवस्था केली आहे. परंतु परिसरातील हॉटेल, फार्म हाऊस जाणीवपूर्वक घंटागाडी कचरा देत नसल्याने त्यांचा कचरा ते डोणजे गावातून वाहणाऱ्या आणि पुढे खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मिळणाऱ्या ओढ्यात टाकण्यात येतो. याविषयी ग्रामपंचायत प्रशासनाने अनेकदा त्यांना ओढ्यात कचरा न टाकण्याची तंबी ही दिली आहे.
ओढ्या-नाल्यांत जर सांडपाणी सोडले जात असेल, तर तेथून ते खडकवासला धरण परिसरात जाते. त्यामुळे दुर्गंधी पसरत असून, आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. आरोग्य विभागामार्फत पाहणी करून उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
हॉटेल, फार्म हाऊस गाडी जात असूनही आणि वेलनेस सेंटर मालक कोणत्याही प्रकारची काळजी घेत नाहीत. कचरा प्रकल्पाचे व्यवस्थापन करणाऱ्या जिव्हाळा फाउंडेशनतर्फे घंटागाडी दररोजी फिरत आहे. – योगेश भामे, ग्रामपंचायत सदस्य