पिरंगुट –मुळशीची सुवर्णकन्या गीता महेश मालुसरे हिने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. रविवारी पुन्हा एकदा उत्तुंग समुद्रभरारी घेत तिने प्रॉंग्स लाईट हाऊस ते बेलापूर जेट्टी हे 32 किलोमीटर अंतर 6 तास 26 मिनिटांत पोहून पूर्ण केले.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात महिला सबलीकरणाचा संदेश देण्यासाठी गीता महेश मालुसरे हिने ही मोहीम पूर्ण केली. गीताने सकाळी 8 वाजता कुलाबा प्रॉंग्स लाइट हाऊस जवळ समुद्रात उडी घेतली आणि पोहायला सुरूवात केली. दुपारी 2.26 वाजता बेलापूर जेट्टी जवळ 32 किलोमिटर अंतर 6 तास 26 मिनिटात गीताने पोहून पार केले. ढगाळ वातावरणामुळे समुद्रात उसळत असलेल्या लाटांना सामोरे जात ही मोहीम यशस्वी पार पाडली.
2017 साली गीताने तिच्या 13व्या वाढदिवसाला मुंबईच्या याच समुद्रात 32 किलोमिटर अंतर पोहून पूर्ण केले होते. करोनामुळे दोन वर्षे गीताचा पोहण्याचा सराव पूर्ण बंद होता. गेल्या दोन महिन्यांत पुन्हा कसून सराव करत गीताने आज 32 किलोमीटरची समुद्रभरारी घेत आपल्या भविष्यातील उद्दिष्ट पूर्ततेसाठी आपण सज्ज असल्याचे दाखवून दिले.
राष्ट्रीय कोच शेखर खासनीस यांनी आजच्या या मोहीमेसाठी गीताला मार्गदर्शन करत तिची तयारी करून घेतली होती. आज त्यांनी स्वत: या मोहीमेत सहभागी होऊन गीताला प्रोत्साहन दिले. त्याबरोबर हर्षद इनामदार होते. स्विमींग फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने स्वीमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे निलेश मकवाना यांनी या मोहिमेचे परीक्षक म्हणून काम पाहिले. या वेळी राष्ट्रीय मार्गदर्शक शेखर खासनीस, हर्षद इनामदार, गीताची आजी शैला मालुसरे, गीताचे वडील महेश मालुसरे, आई दीपा मालुसरे उपस्थित होते. शार्क ऍक्वाटीक क्लब या संस्थेने या मोहिमेचे आयोजन केले होते. सह्याद्री प्रतिष्ठान मुळशी आणि वेस्टर्न घाट रनिंग फाऊंडेशन यांनी या मोहिमेला सहकार्य केले आहे.