पुणे – धायरी येथील गणेशनगरमध्ये मंगळवारी रात्री साडेसातच्या सुमारास एका केमकिलच्या कंपनीला भिषण आग लागली. पीएमआरडीए आणि पुणे अग्निशमन दलाचे तब्बल आठ बंब घटनास्थळी दाखल झाले. ही आग गल्ली क्रमांक दोनमध्ये लागली. आगीत फर्निचर जळून खाक झाले तसेच कारखान्यातील केमिकलच्या बॅरलचे मोठे स्फोट झाले. हे स्फोट किमान तासभर सुरू होते.
फर्निचरच्या रंगकामासाठी तसेच पॉलिशसाठी आणलेल्या केमिकल तसेच फेव्हीकॉलच्या बॅरलचे हे स्फोट असल्याची शक्यता अग्निशमन दलाने व्यक्त केली आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते. या घटनेत जीवीतहानी झाली की नाही? याची माहिती रात्री उशीरापर्यंत घेतली जात होती.
दरम्यान, आगीची झळ आजूबाजूच्या इमारतींना लागण्याची शक्यता लक्षात घेत अग्निशमन दलाच्या जवानांनी तेथील नागरिकांना बाहेर काढले. आग आजूबाजूच्या इमारतींमध्ये पसरू नये म्हणून दक्षता घेण्यात येत होती.