Border Gavaskar Trophy 2023 : कसोटी मालिकेत ‘आर. अश्विन’च ठरला सर्वात भारी

अहमदाबाद – भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत मिळून एकूण 25 बळी घेत रवीचंद्रन अश्विनने एका अनोख्या विक्रमाला गवसणी घातली आहे. बॉर्डर-गावसकर यांच्या नावाने या दोन देशांत होत असलेल्या चार सामन्याच्या कसोटी मालिकेत अश्विनने ही कामगिरी दोन वेळा केली आहे. या मालिकेचे पहिले नामकरण करत आयोजन करण्यात आले ते 2013 साली. याच वर्षीच्या मालिकेत अश्विनने 29 बळी घेत विक्रम साकारला होता.
या चार सामन्यांच्या मालिकेतील नागपूर व दिल्ली कसोटी जिंकत भारताने 2-0 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर इंदुरची कसोटी जिंकत ऑस्ट्रेलियाने मालिकेत 2-1 असे पुनरागमन केले होते. मात्र, अहमदाबादचा चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिला व भारताने ही मालिका याच 2-1 अशा फरकाने जिंकली.
केवळ अश्विननेच नव्हे तर या मालिकेत रवींद्र जडेजानेही तब्बल 22 गडी बाद केले. याच कामगिरीसाठी या दोघांनाही संयुक्तरीत्या मालिकेचे मानकरी घोषित करण्यात आले. अश्विनने बॉर्डर-गावसकर मालिकेत दुसऱ्यांदा 25 किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेण्याची कामगिरी केली आहे. अशी कामगिरी करणारा पहिला गोलंदाज ठरला. यापूर्वी दोन्ही संघांतील कोणत्याही गोलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही.
“एकदिवसीय क्रिकेटचे सामने 40 षटकांचे केले पाहिजेत, अन्यथा जी स्थिती…” माजी क्रिकेटपटूने मांडले मत
सलग 16 वा मालिका विजय
या मालिकेतील विजय हा भारताचा आणखी एक विक्रम ठरला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा यंदाचा हा विजय भारतातील सलग 16 वा मालिका विजय ठरला आहे. त्यामुळेच आता येत्या जूनमध्ये होत असलेल्या आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीतही ऑस्ट्रेलियाला पराभूत करत जागतिक वर्चस्वासाठी भारतीय संघ सज्ज बनला आहे. हा सामना इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर येत्या 7 ते 11 जून या कालावाधीत होत असून या सामन्यासाठी एक अतिरीक्त दिवसही ठेवण्यात आला आहे.





