हडपसर – येथील हांडेवाडी रस्त्यावर रूनवाल सिंगल सोसायटी समोरील रस्ता, सातवनगर येथील रस्त्यावर नेहमीच पावसाळ्यात पाणी साचून राहते. त्यामुळे नागरिकांना व वाहनचालकांना चांगलाच त्रास सहन करावा लागतो. मात्र, आता महापालिकेने येथे पावसाळी गटार लाइनचे काम हाती घेतले आहे. या पावसाळी गटार लाइनमुळे पावसाचे पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढेल तेव्हा पाण्याचा निचरा पहिल्यापेक्षा लवकर होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्यात हांडेवाडी रोडवर पाणी साचून राहणार नाही, असा दावा नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे यांनी केला.
नगरसेवक भानगिरे यांच्या विशेष प्रयत्नातून हांडेवाडी रस्त्यावर सातवनगर ते बडदे मळा व श्रीराम चौक मार्गे नवीन पावसाळी गटार लाइन टाकण्याचे काम सुरू आहे. या कामाची पाहणी नगरसेवक नाना भानगिरे यांनी केली. त्यावेळी महापालिका अधिकारी विनायक शिंदे व रविंद्र मुळे सोबत होते. हांडेवाडी रोडवरील रूनवाल सिगल सोसायटी, संस्कृती सोसायटी, फिफ्त अव्हेन्यू सोसायटी, नमो विहार सोसायटी, सिद्धिविनायक विहार सोसायटी, ई.सी.पी. वास्तू सोसायटी, संपूर्ण सातव नगर पासून ते बडदे मळा पर्यंत 1.5 मीटर व्यासाची पावसाळी लाइन टाकण्याचे काम सुरू आहे. हे लवकर पूर्ण करण्यात यावे, याशिवाय संपूर्ण रस्त्यावर किंवा सखल भागात पाणी साचून राहणार नाही, याची दक्षात घेऊन तसे कामाचे नियोजन करावे, असा सूचनाही यावेळी नगरसेवक नाना भानगिरे यांनी केल्या. दरम्यान, पावसाळी गटार लाइनचे काम सुरू झाल्यानंतर नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
हांडेवाडी रस्त्यावर पावसाळ्यात वाहनचालकांना तसेच नागरिकांना ये-जा करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. रस्त्यावर पाण्याचे तळे साचत होते. या रस्त्यावर रहदारी करीत असताना येथिल नागरिकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत होती. त्यात रुणावल व फिफ्त अव्हेन्यू सोसायटी मध्ये पार्किंग मध्ये पाणी घुसल्या कारणाने येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून पावसाळी गटार लाइनचे काम मार्गी लागत आहे. मुख्य रस्त्यावर काम होताना नागरिकांना थोडी गैरसोय होणार आहे. मात्र, हे आवश्यक असल्याने त्यांनी सहकार्य करावे.
– प्रमोदनाना भानगिरे, नगरसेवक