पुणे –महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला मतदानाची आकडेवारी लक्षात घेता दि. 8 मार्चला महिला दिनी पीएमपी बसमधून मोफत प्रवास करता येणार आहे. नगरसेवकांकडून हा “अभिवन प्रयोग’ करण्यात आला आहे. महापालिकेच्या महिला आणि बालकल्याण समितीकडून तसा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
महिला आणि बालकल्याण समितीने असा ठराव मंजूर केला असला, तरी हा धोरणात्मक निर्णय असल्याने त्याची अंमलबजावणी मुख्य सभेच्या मान्यतेनंतरच होणर आहे. मात्र, निवडणूक आल्याने याबाबतचा निर्णय घेतला जावा, यासाठी नगरसेवकांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. परंतु, या उपक्रमातून पालिकेलाच आर्थिक झळ सोसावी लागणार आहे.
एप्रिल किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठड्यात पालिकेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यातच दहा दिवसांत म्हणजेच दि. 14 मार्चला पालिकेची मुदत संपुष्टात येत आहे. तर. जागतिक महिला दिन दि. 8 मार्चला आहे. त्यामुळे या दिवशी महिला मतदारांना खुष करण्यासाठी सदर उपक्रम राबविण्याची मागणी होत आहे. महिला दिनाचे औचित्य साधून विविध उपक्रमही नगरसेवकांकडून दि. 8 मार्चला राबविण्यात येणार आहेत. याच कारणातून महापालिकेच्या खर्चातून महिलांना मोफत प्रवासाचा उपक्रम राबविला जात आहे.
उपक्रम कायम स्वरूपी राबवा?
पीएमपीमध्ये महिलांना 50 टक्के आसने आरक्षित आहेत. याशिवाय शहरात “तेजस्विनी’ ही महिलांसाठीची बससेवाही पीएमपीकडून सुरू आहे. त्यामुळे या सुविधांचा वापर आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतांची गोळाबेरीज करण्यासाठी केला जाणार आहे. तर, महिला दिनी राबविण्यात येणारा हा उपक्रम कायम स्वरूपी का राबविला जात नाही. दिल्लीत महिलांना बस प्रवास मोफत आहे, मग पुण्यात का नाही? असा प्रश्न या निमित्त उपस्थित होऊ शकतो.