प्रतिकिलोस 70 ते 120 रुपये भाव
पुणे(प्रतिनिधी) – गोड चवीच्या जांभळांची आवक गुजरात येथून सुरू झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल महिनाभर उशिराने जांभूळ बाजारात दाखल झाले आहे. त्यास घाऊक बाजारात दर्जानुसार प्रतिकिलोस 70 ते 120 रुपये भाव मिळाला. पुढील आठवड्यापासून परराज्यासह राज्यातील विविध भागांतून जांभळाची सुरळीत आवक सुरू होण्याचा अंदाज आडत्यांनी वर्तविला.
मार्केटयार्डातील फळविभागात बडोदा येथून जांभळांची 95 ते 100 क्रेट्स विक्रीसाठी दाखल झाली. एका क्रेटमध्ये 20 किलो जांभळे असतात. यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर मार्केट बंद राहिले. त्यामुळे, जांभळांची आवक झाली नाही. येत्या काही दिवसांत गुजरातसह कोकण, रत्नागिरी, महाडसह सोलापूर आणि नगर जिल्ह्यांतून जांभळांची आवक होईल. याप्रकारे बाजारात दररोज 500 ते 600 क्रेट्समधून जांभळे बाजारात दाखल होतील. गेल्या वर्षीच्या तुलनेत मागणी कमी असून भाव टिकून आहेत. जांभळाचा दर्जा चांगला असून चवीला गोड आहेत. मधुमेहासाठी जांभुळ उपयोगी ठरत असल्याने मागील काही वर्षांपासून त्यास मागणी वाढल्याचे व्यापारी पांडुरंग सुपेकर यांनी सांगितले.