– हनुमंत चिकणे
उरुळी कांचन-येथील तळवाडी व जुन्या एलाईट चौकात वाहतुकीची कोंडी होणे, ही बाब दररोजच नित्याचीच झाली असल्याने त्यात स्थानिक नागरिकांसह पुणे-सोलापूर महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. याबाबत लोणी काळभोर वाहतूक शाखा कोणतीही उपाययोजना करीत नसल्याने, स्थानिकांच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे.
हडपसर ते चौफुला दरम्यान अनेक अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने रस्त्यावर ठिकठिकाणी उभी असतात; याकडे वाहतूक शाखा काणाडोळा करत असल्याने अनेक स्थानिक आश्चर्य व्यक्त करतात. त्यामुळे लोणी काळभोर पोलिसांचा वाहतूक शाखा व अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांचे “माया’वी संबंधांमुळे वाहनांवर कारवाई होत नसल्याचे दिसून येते. सर्वसामान्य नागरिकांना लहान-लहान बाबींमध्येदेखील नियमाचा ‘बाऊ’ दाखवून दंडात्मक कारवाईचा बडगा उगारणारे वाहतूक पोलीस, अवैध प्रवासी वाहतुकीबद्दल चकार शब्द ही बोलत नाहीत.
हडपसरहून लोणी काळभोर, उरुळी कांचन, यवतसह चौफुल्याला जाण्यासाठी तीन चाकी रिक्षांपासून टेम्पो आणि कारमध्ये देखील बिनधास्त बेकायदेशीर प्रवासी वाहतूक सुरू असते. जलद वाहन मिळत असल्याने प्रवासीदेखील कसलाही विचार न करता या वाहनांमध्ये बसतात. जास्त पैशांच्या हव्यासापोटी तीनचाकी रिक्षासह सहाआसनी रिक्षाचालकही आपल्या वाहनात क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहनात कोंबतात आणि जास्त फेऱ्या मारण्यासाठी भरधाव वेगाने वाहने पळवतात.
हडपसरहून यवतकडे रोज पाचशेहून अधिक बेकायदा प्रवासी वाहतूक करणारी वाहने धावत असून, संबंधित वाहन चालकाकडे परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) फिट प्रमाणपत्र नसणे, वाहन पासिंग, वाहनांचा विमा न करणे, चालकाकडे वाहन परवाना नसणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवणे, खासगी वाहने प्रवासी वाहतुकीसाठी वापरणे अशा कित्येक प्रकारे नियमांना धाब्यावर बसवले जात आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावर मागील काही महिन्यांपासून अवैध प्रवासी वाहतुकीचे प्रमाण वाढू लागल्याने वाहतूक पोलीस नेमके करतात तरी काय, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात वाहतूक विभागात एक वरिष्ठ पोलीस अधिकारी, ट्रॅफिक हवालदार व वार्डन अशी 25 ते 26 जणांची नेमणूक करण्यात आलेली आहे. लोणी स्टेशन चौक, कुंजीरवाडी व उरुळी कांचन गावातील चौकात पोलीस दिसत असले तरी, कोंडी मात्र कायम दिसते.
स्थानिक दुकानदारांचा दबाव
उरुळी कांचन हद्दीतील तळवाडी चौकीत अपवाद वगळता बाराही महिने अठरा तास वाहतूक कोंडी आढळून येते. या चौकात रस्त्यातच बेकायदा वाहतूक करणाऱ्या रिक्षा, मोठी वाहने, खासगी वाहने थांबतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूंचा सेवारस्ता हा टपरीचालक व हातगाड्यांनी व्यापला आहे. त्यामुळे पायी चालणेही जीवावर बेतू शकते; मात्र स्थानिक दुकानदारांच्या दबावापोटी पोलीस व लोकप्रतिनिधी कारवाई करत नाही. अशी चर्चा नागरिक करीत आहेत.
स्वारगेट एस. टी. डेपो व शेवाळवाडी येथील पीएमपीएमलच्या डेपो अधिकाऱ्यांना उरुळी कांचन येथील थांबे पुढे घेण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे. तसेच जेजुरीकडे जाण्यासाठी जवळचा रस्ता असल्याने मोठी व लहान वाहने याच मार्गावरून जातात. तसेच तरडेतील डीझेल डेपो येथील अधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आले आहे. नेहमीपेक्षा जास्त वाहतूक पोलीस उरुळी कांचन परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी कार्यरत आहेत.
-अशोक तोरडमल, पोलीस निरीक्षक, लोणी काळभोर वाहतूक शाखा